उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य: "..अन्यथा रामदास कदमांना सांगलीत पाय ठेवू देणार नाही"
By अविनाश कोळी | Published: September 21, 2022 01:37 PM2022-09-21T13:37:23+5:302022-09-21T13:38:00+5:30
भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेवर आगपाखड करण्याचा उद्योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदार नेत्यांनी चालवलेला आहे
सांगली : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्हा शिवसेनेच्यावतीने आज, बुधवारी रामदास कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारण्याचे आंदोलन करण्यात आले. यावेळी कदम यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
सांगलीच्या बाळासाहेब ठाकरे चौकात आंदोलन करण्यात आले. रामदास कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारुन, काळे फासण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. कदम यांनी माफी न मागितल्यास सांगली जिल्ह्यात त्यांना पाय ठेवू न देण्याचा इशारा देण्यात आला.
जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले की, ज्या ताटात खायचे त्याच ताटात घाण करायची सवय रामदास कदम यांना आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी रामदास कदम यांना नेता करुन आमदारकी, मंत्रीपदे दिली, त्याच कुटुंबाबद्दल ते इतक्या खालच्या पातळीवर टीका करतील, अशी अपेक्षा कुणी केली नव्हती.
भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या रामदास कदमांनी खरा रंग दाखविला
कधीही आयुष्यात ठाकरे कुटुंबाबद्दल अपशब्द काढणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या रामदास कदम यांनी चारच दिवसात खरा रंग दाखविला. भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेवर आगपाखड करण्याचा उद्योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदार नेत्यांनी चालवलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाची माफी त्यांनी मागावी, अन्यथा कदम यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, जिल्हा संघटक बजरंग पाटील, सुजाता इंगळे, मनीषा पाटील, सुनंदा पाटील, मयूर घोडके, रुपेश मोकाशी, सुरेश साखळकर, संतोष पाटील, स्नेहल माळी, माधुरी चव्हाण, राजेंद्र पाटील, विजय गडदे, संजय वडर, नईम शेख, सूरज पवार आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.