सांगलीत रामकथा सोहळा, शोभायात्रेने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 06:16 PM2023-01-06T18:16:37+5:302023-01-06T18:16:56+5:30
शोभायात्रेच्या अग्रभागी हत्ती, घोडे, उंट
सांगली : हत्ती, घोडे, उंट, ढोल-ताशांचा कडकडाट, झांज व लेझीम पथकाच्या तालावर धरलेला ठेका, जय श्रीरामचा जयघोष आणि भगव्या झेंड्यांनी उजळलेला परिसर अशा धार्मिक वातावरणात सांगलीत निघालेल्या शोभायात्रेने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. निमित्त होते रामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे.
कल्पद्रुम क्रीडांगणावर रामकथा आणि नामसंकीर्तन सोहळा आयोजित केला आहे. नेज (जि. बीड) येथील समाधान महाराज शर्मा मराठीतून रामकथा सांगणार आहेत. यानिमित्ताने गुरुवारी कलश शोभायात्रा झाली.
राम मंदिर चौकातून ही शोभा यात्रा निघाली. जयंत सावंत आणि रामबीर सागवान परिवार मुख्य यजमान होते. शोभायात्रेच्या अग्रभागी हत्ती, घोडे, उंट होते. लेझीम, धनगरी ढोल, वानरसेना, झांज पथकाने ताल धरला होता. राम, लक्ष्मण, जानकी, हनुमान यांच्या रूपातील मुलांचा रथ सजला होता. या मुलांना एकावेळी खांद्यावर उचलून घेण्यात आले आणि जल्लोष करत जय बोलो हनुमान की, असा गजर झाला. राम मंदिरपासून पुष्पराज चौक, वसंतदादा मार्केट यार्ड, महावीर उद्यान आणि तेथून नेमिनाथनगर असा प्रवास करत यात्रा क्रीडांगणावर पोहोचली.
माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, नितीन शिंदे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विनोद घोडावत, गुलशन अग्रवाल, नितीन झंवर, प्रसाद जगताप, राजेंद्र घोडावत, अध्यक्ष पन्नालाल त्रिवेदी, विश्वास गवळी, कार्याध्यक्ष मनोहर सारडा, सचिव लक्ष्मण नवलाई, राहुल पाटील, पदाधिकारी ओमप्रकाश झंवर, अनिल मानधना, वसंत पाटील, गोपाळ बजाज, रोहित हिडदुग्गी, श्रीगोपाळ सारडा, रामनिवास बजाज, संजय डोडिया, सतीश मालू, अनिल मानधना, नितीन झंवर यांनी स्वागत केले.
रामकथा, कीर्तनाला सुरुवात
शोभायात्रेच्या सांगता झाल्यानंतर दुपारी रामकथा सांगण्यास सुरुवात झाली. समाधान महाराज शर्मा यांनी रामकथा मराठीतून सांगितली. सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम झाला. शुक्रवारी योगसाधना, सर्वरोगनिदान शिबिर होणार आहे. तर रात्री श्रीगुरू कृष्णा महाराज चवरे यांचे कीर्तन होईल.