रामराजेंनाही रावणासारखा सत्तेचा उन्माद

By admin | Published: July 10, 2017 11:27 PM2017-07-10T23:27:26+5:302017-07-10T23:27:26+5:30

रामराजेंनाही रावणासारखा सत्तेचा उन्माद

Ramrajenena not like Ravana | रामराजेंनाही रावणासारखा सत्तेचा उन्माद

रामराजेंनाही रावणासारखा सत्तेचा उन्माद

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : ‘एकवीस वर्षे लाल दिवा असताना प्रत्येक वर्षी नीरा-देवघर कालव्याचे दरवर्षी दीड किलोमीटरचे जरी काम रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले असते तर आज या कालव्याचे काम पूर्ण होऊन फलटण तालुक्याचा दुष्काळ हटला असता. मात्र, लाल दिव्यासाठी बारामतीकरांची लाचारी पत्करून रामराजेंनी फलटण तालुक्याच्या हक्काचे ८० टक्के पाणी बारामतीला विकल्याचा आणि येथील जनतेची फसवणूक केली आहे. रावणाला जसा सत्तेचा उन्माद चढला होता. तसा रामराजेंना सत्तेचा उन्माद चढला आहे,’ असा घणाघात माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला.
नीरा-देवघर कालव्यांची कामे पूर्ण व्हावी, हक्काचे पाणी फलटण, माळशिरस तालुक्याला मिळावे यासाठी माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर नेतृत्वाखाली नीरा-देवघर कृती समितीच्या वतीने प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढल्यानंतर गजानन चौक येथे आयोजित जाहीर सभेत आ. जयकुमार गोरे बोलत होते.
यावेळी माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर, कृष्णा खोऱ्याचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, जयकुमार शिंदे, अ‍ॅड. नरसिंह निकम, शिवाजीराव फडतरे, सिराज शेख आदी उपस्थित होते.
फलटण तालुक्यातील जनतेने १९९५ सालापासून रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हाती आजअखेर एकतर्फी सत्ता दिली. मोठे प्रेम दिले. मात्र, स्वत:ला आधुनिक भगिरथ म्हणवून घेणाऱ्या रामराजेंनी धोम-बलकवडीच्या फक्त एक टीएमसी पाण्याची टिमकी वाजवून ज्याच्यापासून जास्त फायदा आहे. त्या नीरा-देवघरच्या कालव्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले. काहीही संबंध नसताना व फक्त हे पाणी फलटण, खंडाळा, माळशिरस तालुक्याच्या हक्काचे असताना बारामतीला सत्तेच्या हव्यासापोटी पाणी दिले आहे. कागदोपत्री ६० टक्के पाणी बारामतीला दिले हे दाखवत असले तरी ८० टक्के पाणी बारामतीला पळवून नेले जात आहे. याला रामराजे जबाबदार असून, त्यांनी फलटण, खंडाळा तालुक्यांतील जनतेची घोर फसवणूक करून स्वत: सत्तेची ऊब भोगल्याची टीका आ. गोरे यांनी केली.
‘माझ्या डोक्याच्या नादी लागू नका,’ असे वारंवार म्हणणाऱ्या रामराजेंचे डोके बारामतीला जात असताना का चालत नाही. हिम्मत असेल तर बारामतीला जाणारे पाणी अडवून दाखवा, मी तुमचा स्वत: हार घालून सत्कार करीन,’ असे आव्हान आ. गोरे यांनी दिले.
मी फलटणकरांच्या प्रत्येक लढ्यात सहभागी होणार असून, विधानसभेतही नीरा-देवघरच्या प्रश्नावर आवाज उठविणार असल्याचे आ. गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
१६ जुलैला रास्ता रोको : हिंदुराव नाईक-निंबाळकर
नीरा-देवघरच्या पाण्यासाठी आजचा हा मोर्चा असून, हा पहिला टप्पा आहे. दि. १६ रोजी लोणंद ते फलटण येथून माळशिरसपर्यंत रास्ता रोका आंदोलन करण्यात येणार आहे. आता नीरा-देवघरच्या पाणी प्रश्नावर आता माघार नाही. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत लढा देणार असून, बारामतीला पाणी देणाऱ्या रामराजेंना जाब विचारण्याचे आवाहन माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी केली.
केवळ सत्ता भोगण्यात धन्यता : रणजितसिंह
‘रामराजे यांनी आतापर्यंत फलटणच्या जनतेला पाणी प्रश्नावर भुलवून स्वत: सत्ता भोगण्यात धन्यता मानली आहे. काहीही संबंध नसताना बारामतीकर पाणी पळवून नेत असताना रामराजे चकार शब्द बोलत नाही. एवढी लाचारी त्यांनी सत्तेच्या मोहापायी पत्करली आहे.
फलटणंच्या जनतेला पाणी प्रश्नावर फसविणाऱ्या रामराजे यांना येथील जनता हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही,’ असा टोला यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लगावला.

Web Title: Ramrajenena not like Ravana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.