महामार्गावर तब्बल दहा किलोमीटरवर रांगा

By admin | Published: September 4, 2016 12:09 AM2016-09-04T00:09:11+5:302016-09-04T00:30:14+5:30

तासवडेत वाहनांची गर्दी अन् हॉर्नचा गोंगाट

Range at a distance of ten kilometers on the highway | महामार्गावर तब्बल दहा किलोमीटरवर रांगा

महामार्गावर तब्बल दहा किलोमीटरवर रांगा

Next

वाहतुकीची कोंडी : कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची सातारा- कऱ्हाडात गर्दी; वाहतूक पूर्ववत करताना पोलिसांची दमछाक
भुर्इंज : महाड येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव व ईदसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना पुणे-बेंगलोर महमार्गाद्वारे कोकणात जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे शनिवारी सातारा जिल्ह्यातील महामार्गावर वाहनांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल दहा किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी टळली जावी, यासाठी सातारा व भुर्इंज पोलिस ठाणेच महामार्गावर अवतरले होते.सोमवारी गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्याआधी शनिवार आणि रविवारची सुटी जोडून आल्याने शनिवारी सकाळपासूनच महामार्गावर वाहनांचा लोंढा वाढला. दुपारपर्यंत विशेषत: मुंबई व पुण्याच्या दिशेने कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. वाहनांच्या या प्रचंड गर्दीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण होऊन बसले होते तसेच जेथे क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडत होता; मात्र वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे भुर्इंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी रस्त्यावर उतरले.दुपारनंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरही वाहनांची प्रचंड गर्दी वाढली, त्यामुळे दिवसभर महामार्गावर वाहनांचा लोंढा लागला होता. या प्रचंड गर्दीमुळे पोलिसांनी अक्षरश: वडापाव खाऊन वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी दिवसभर यंत्रणा राबविली. महामार्गालगतच्या हॉटेल्समध्येही शनिवारी वाहनांची नेहमीपेक्षा मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)

तासवडेत वाहनांची गर्दी अन् हॉर्नचा गोंगाट
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे येथील टोलनाका वाहनांच्या गर्दीने शनिवारी फुल्ल झाला होता. सातारा-कोल्हापूर लेनवर वाहनांच्या सुमारे अर्ध्या किलोमीटपर्यंत रांगा लागल्या होत्या. सलग आलेल्या सुट्यांमुळे अनेक नोकरदार गावी परतणार असल्याने वाहनांची गर्दी
वाढली होती. या गर्दीतच काहीवेळा वादावादीच्या घटनाही घडल्या. वाहनांच्या टोलची रक्कम लवकर घेता यावी, यासाठी टोलनाका व्यवस्थापनाचे कर्मचारी बुथ सोडून रांगेत घुसले होते; मात्र तरीही वाहनांची गर्दी कमी होत नव्हती. रात्री उशिरापर्यंत टोलनाक्यावर वाहनांची गर्दी व हॉर्नचा गोंगाट होता.


जिल्हाधिकारी, एसपींकडून पाहणी
अश्विन मुदगल व पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही महामार्गावरील वाहन गर्दीचा आढावा घेतला. आनेवाडी टोलनाका व्यवस्थापनाने घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांनीही स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत आनेवाडी टोलनाक्यावर टोलवसुली सुरूच होती. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर होत होती. टोलनाका व्यवस्थापनाची ही भूमिका म्हणजे ‘तिकडे दुनियेला आग लागली तरी चालेल; पण आमचे घर भरले पाहिजे,’ अशी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Web Title: Range at a distance of ten kilometers on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.