उपाध्यक्षपदी रणजित पाटील

By admin | Published: April 12, 2016 10:14 PM2016-04-12T22:14:41+5:302016-04-13T00:11:02+5:30

जिल्हा परिषद : सावंत, पाटील, लोहार, यमगर यांची नावे आघाडीवर

Ranjeet Patil as Deputy Chairman | उपाध्यक्षपदी रणजित पाटील

उपाध्यक्षपदी रणजित पाटील

Next

सांगली : जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी कामेरी (ता. वाळवा) येथील रणजित पाटील यांची निवड निश्चित समजली जाते. उर्वरित चार सभापती पदांबाबत मात्र नेत्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच होते. समिती सभापती पदासाठी जत तालुक्यातून संजीवकुमार सावंत, सुनंदा पाटील, कवठेमहांकाळमधून तानाजी यमगर आणि शिराळा तालुक्यातून जगन्नाथ लोहार यांची नावे मुंबईतील बैठकीत आघाडीवर होती.
मुंबईत मंगळवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, आ. सुमनताई पाटील, माजी आ. राजेंद्रआण्णा देशमुख, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्यासह भाजप-सेनेचे आमदार उपस्थित होते. उपाध्यक्षपदी रणजित पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. जत तालुक्याला दोन सभापतिपदे जाण्याची शक्यता आहे. एक पद राष्ट्रवादीला आणि दुसरे विलासराव जगताप समर्थकाला मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून सुनंदा पाटील, रूपाली पाटील, तर जगताप गटाकडून सुशिला होनमोरे, संजीवकुमार सावंत यांची नावे चर्चेत होती. सुनंदा पाटील, संजीवकुमार सावंत यांची नावे निश्चित झाल्याची चर्चा आहे. आटपाडी तालुक्यातून खरसुंडीच्या कुसूम मोटे यांचेही नाव चर्चेत आले होते. पण, शिराळा तालुक्यातील जगन्नाथ लोहार यांना संधी देण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे त्यांचेही नाव पुन्हा आघाडीवर आले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातून माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक तानाजी यमगर यांना संधी देण्यास कुणाचाही विरोध नाही. पण, दत्ताजीराव पाटील, भाऊसाहेब पाटील यांनी संधी देण्याची मागणी केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. तासगाव तालुक्यास जि. प. अध्यक्ष पदासह एक सभापतीपद देण्याची जोरदार मागणी आर. आर. पाटील (आबा) गटाकडून झाली. परंतु, नेत्यांनी सर्व तालुक्यांचा समतोल राखण्यासाठी आबा गटाला संयमाची भूमिका घेण्याची सूचना दिली. (प्रतिनिधी)

आज निवडी : इच्छुकांची उत्सुकता शिगेला
जिल्हा परिषद उपाध्यक्ष व चार सभापतींच्या निवडी बुधवार, दि. १३ रोजी होणार आहेत. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांताधिकारी सुभाष बोरकर यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत अर्ज दाखल करणे, तर दुपारी १२ ते १२.१५ पर्यंत अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. दुपारी १२.१५ ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. पदाधिकारी निवडीत पाचपेक्षा जादा अर्ज राहिल्यास निवडणूक होणार आहे. तोपर्यंत इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

खानापूरची संधी हुकली
खानापूर तालुक्यातून अनिल बाबर गटाकडून फिरोज शेख, तर राजेंद्रअण्णा देशमुख गटाकडून किसन जानकर यांना संधी मिळण्याची शक्यता होती. पण, दोन्ही नेत्यांच्या भांडणात खानापूर तालुक्याची संधीच हुकली आहे.

Web Title: Ranjeet Patil as Deputy Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.