देणगीच्या नावाखाली खंडणी वसुली

By admin | Published: March 20, 2016 12:20 AM2016-03-20T00:20:06+5:302016-03-20T00:20:06+5:30

राजकीय गुंडगिरी वाढली : इस्लामपूर पालिका निवडणुकीचे वेध

Ransom recovery in the name of donation | देणगीच्या नावाखाली खंडणी वसुली

देणगीच्या नावाखाली खंडणी वसुली

Next

अशोक पाटील इस्लामपूर
इस्लामपूर पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ज्याच्या मनगटात जोर आणि आर्थिक बाजू भक्कम आहे तेच उमेदवारीला पात्र असल्याचे मानले जाते. त्यामुळे शहरातील काही राजकीय गुंडांनी काही धनदांडग्यांना देणगीच्या नावाखाली खंडणी मागण्यास सुरुवात केली आहे.
पालिकेतील पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना मानणाऱ्या नगरसेवकांची आणि कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याचा दावा भाऊ समर्थकांचा आहे. आगामी निवडणुकीत स्वत: पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील उतरणार आहेतच. तसेच त्यांनी आपल्या गटातील काहींची उमेदवारी निश्चित केल्याचेही समजते. विजयभाऊ पाटील हे राष्ट्रवादीचे खंदे समर्थक आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत साम, दाम, दंडाचा फॉर्म्युला घेऊनच निवडणुकीत उतरण्याचा निश्चय विजयभाऊ गटाने केला आहे.
नेहमीप्रमाणे आगामी निवडणुकीत एन. ए. गु्रप आक्रमक होणार आहे. त्या गु्रपचे जयवंत पाटील हे दुहेरी खून खटला प्रकरणात अडकले असले, तरी ते तुरुंगातूनच निवडणुकीची सूत्रे हलवणार आहेत. याच गु्रपचे खंडेराव जाधव आपल्या गटाला जास्तीत जास्त जागा मिळवून पालिका सभागृहात एन. ए. गु्रपची ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
अ‍ॅड. चिमण डांगे आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येक निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतात. यावेळीही डांगे गटाची ताकद वाढावी म्हणून जास्तीत-जास्त उमेदवार मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. या तिन्ही गटांकडून उमेदवारी मिळाली नाही, तर विरोधी गटाकडे जाण्याची भाषा आत्तापासूनच काही कार्यकर्ते बोलत आहेत. यातूनच मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही गल्लीबोळातील फाळकूटदादांनी निवडणुकीसाठी देणगीच्या नावाखाली धनदांडग्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली करण्यास सुरुवात केली आहे.
याउलट विरोधी गटात शांतता असून, महाडिक युवा शक्ती निवडणुकीच्या रणांगणात मोठ्या ताकदिनीशी उतरण्याची शक्यता आहे. तर भाजप युवामोर्चाचे विक्रम पाटील कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी विरोधात प्रत्येक प्रभागात एकास एक उमेदवार देणार आहेत. शिवसेनेचे आनंदराव पवार, काँग्रेसचे वैभव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची नेमकी काय भूमिका राहील, हे त्यावेळीच ठरणार आहे.
एकंदरीत येणाऱ्या पालिका निवडणुकीत प्रभाग रचनेत बदल झाले आहेत. प्रभाग लहान झाल्याने सर्वसामान्यांनाही राजकारणात जाण्याचे वेध लागले आहेत. ज्याचे प्रभागावर थोड्याफार प्रमाणात वर्चस्व आहे तेही निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत.
दहशतीचा प्रयत्न : वेळीच रोखण्याची गरज
यंदाची नगरपरिषद निवडणूक नवीन राजकीय समीकरणांवर होत आहे. प्रभागवार रचनेमुळे आता मतदारांची संख्या अकराशे ते बाराशेच्या दरम्यान असणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत एका उमेदवाराला कमीत कमी ५० ते ६० लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसह विरोधकांच्या उमेदवारांची संख्या वाढणार, हेही निश्चित आहे. सर्वसाधारण हिशेब केला, तर एका प्रभागात किमान दोन कोटीवर उलाढाल होणार, असे दिसते. त्यासाठी लागणारा निधी या ना त्या मार्गाने गोळा करण्यास काही राजकीय गुंड सरसावलेले दिसतात. त्यामुळे या राजकीय गुंडांच्या आशीर्वादानेच काही फाळकूटदादा आता इस्लामपूर शहरात दहशत निर्माण करीत आहेत. या सर्व गुंडांना वेळेत आवरले नाही तर आगामी निवडणुकीत संवेदनशील स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे पोलिसांनीही वेळीच सावधानता बाळगून अशा वृत्ती वेळीच रोखण्याची गरज आहे.

Web Title: Ransom recovery in the name of donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.