शेकापचे ज्येष्ठ नेते रावसाहेब शिंदे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:06+5:302021-01-03T04:27:06+5:30
क्रांतीसिंह नाना पाटील यांचे अनुयायी असलेले रावसाहेब शिंदे यांनी आयुष्यभर गोरगरीब जनता, शेतकरी, मजूर, कामगार यांच्या न्यायासाठी लढा दिला. ...
क्रांतीसिंह नाना पाटील यांचे अनुयायी असलेले रावसाहेब शिंदे यांनी आयुष्यभर गोरगरीब जनता, शेतकरी, मजूर, कामगार यांच्या न्यायासाठी लढा दिला. यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढून आवाज उठविला. सार्वजनिक जीवनात वावरताना त्यांनी राजकारण कमी आणि समाजकारण जादा या तत्त्वानुसार काम केले. ग्रामीण शैलीमधील त्यांची भाषणे तत्कालीन परिस्थितीवर घणाघाती प्रहार करीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते कुस्ती क्षेत्रात कार्यरत होते. जुन्या पिढीतील नामवंत मल्ल म्हणून ते सर्व परिचित होते. वयाच्या नव्वदीपर्यंत त्यांची जिल्ह्यातील प्रत्येक कुस्ती मैदानात आवर्जून उपस्थिती असायची. कुस्ती क्षेत्रासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. त्यासाठी त्यांनी बेणापूर येथे बाळासाहेब शिंदे कुस्ती प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली.
रावसाहेब शिंदे यांनी १९८३ पासूनच दुष्काळ निर्मूलन चळवळ उभारण्यात श्रमिक मुक्ती दलाचे आघाडीचे कार्यकर्ते म्हणून सहभाग घेतला. दुष्काळ निर्मूलन आणि समान पाणी वाटप याविषयीचे मूलभूत धोरण विकसित होण्याचा पाया घालण्यात रावसाहेब शिंदे यांचा मोलाचा वाटा होता, आटपाडी तालुक्यात १९९३ मध्ये पहिली पाणी परिषद झाली. त्याच्या प्रसार कामामध्येसुद्धा रावसाहेब अण्णांचा सक्रिय सहभाग होता.
फोटो-०२रावसाहबे शिंदे निधन