कांदे येथे मुलीवर बलात्कार
By Admin | Published: April 16, 2017 10:53 PM2017-04-16T22:53:37+5:302017-04-16T22:53:37+5:30
दोघांविरूद्ध गुन्हा : एकास पकडून नातेवाईकांकडून बेदम चोप
शिराळा/मांगले : कांदे (ता. शिराळा) येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
या घटनेनंतर संतप्त मुलीच्या नातेवाईकांनी मुख्य संशयित अक्षय महावीर घोलप (वय २0, रा. थेरगाव, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) यास पकडून बेदम चोप दिला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तर यातील दुसऱ्या संशयिताचा शोध सुरु आहे.
अक्षय घोलप व त्याचा मित्र हे दोघेही दुचाकीवरुन कांदेत नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. ते या मुलीच्या घरीही गेले होते. रात्री मुलगी कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी अक्षयने तिचा पाठलाग केला. व अंधाराचा फायदा घेत तिच्या तोंडाला रुमाल बांधून जबरदस्तीने तिला दुचाकीवर बसविले.
अक्षयच्या मित्राने तिला दुचाकीवर पकडून ठेवले. या दोघांनी तिला कांदे-सावर्डे पुलाजवळ नेले. तेथे अक्षयने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ही घटना कोणाला सांगू नये, यासाठी धमकीही दिली. दोघांनीही तिला तिच्या घराजवळ सोडून पलायन केले.
या प्रकारामुळे मुलीची प्रकृती बिघडली. घरच्यांनी तिची चौकशी केल्यानंतर, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. नातेवाईकांनी अक्षयचा शोध घेण्यासाठी थेट त्याचे थेरगाव गाठले. तेथे अक्षयला घरातून ओढून बेदम चोप दिला. त्याला तेथून ताब्यात घेऊन शिराळा पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही मुलगी सहावीत शिकते आहे. मुलीतर्फे तिच्या आईने शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुलीची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेतील अक्षयची कसून चौकशी केली असता, आपण एकटेच होतो, असे त्याने सांगितले. तरीही पोलिस चौकशी करीत आहेत. त्याचा मित्राचा शोध सुरू आहे. (वार्ताहर)
मित्राचे पलायन; शोधासाठी पथक रवाना
या मुलीचे नातेवाईक थेरगावला गेले; त्यावेळी त्याचा मित्र अंधाराचा गैरफायदा घेऊन शौचालयात लपून बसला. त्याने शौचालयाचे दार मोडून पलायन केले. पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे, पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी कांदे येथे भेट देऊन पाहणी केली व या मुलीची चौकशी केली. त्याच्या मित्राच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध भागात रवाना केली आहेत.