Sangli: आश्रमशाळेतील असहाय अल्पवयीन मुलींवर अत्याचार; अरविंद पवारसह महिलेस जन्मठेप
By हणमंत पाटील | Published: January 8, 2024 05:13 PM2024-01-08T17:13:18+5:302024-01-08T17:13:53+5:30
कुरळपच्या आश्रमशाळेतील मुलींवरील अत्याचार प्रकरण;सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार
युनूस शेख
इस्लामपूर : पाच वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या कुरळप (ता.वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेतील असहाय अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या खटल्यात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश ए. एस.गांधी यांनी संस्थांचालकासह एका महिलेस चारवेळा जन्मठेप आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात स्वतंत्र शिक्षा दिली.दंडाची रक्कम न भरल्यास दोघांना आणखी शिक्षा भोगावी लागणार आहे.एकावेळी चार जन्मठेप देण्याचा हा न्यायालयाचा ऐतिहासीक निकाल ठरला.
अरविंद आबा पवार (६६) आणि मनीषा चंद्रकांत कांबळे (४३,दोघे रा.कुरळप) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमातून दोघांची न्यायालयाने मुक्तता केली.दंडाच्या रकमेतील प्रत्येकी ५० हजार रुपये अत्याचारित चार पीडित मुलींना तर विनयभंग झालेल्या दोन पीडित मुलींना प्रत्येकी ५ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश न्या. गांधी यांनी दिले आहेत.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या खटल्यात बलात्कारासाठीच्या भारतीय दंडविधानातील विविध कलमाखाली आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार ही शिक्षा सुनावली.
पाच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१८ मध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्रावरून या अत्याचाराच्या घटनेची पोलीसांनी पोलखोल केली.त्यांनतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.त्यावेळी मिनाई आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार आणि शाळेतील सहायक कर्मचारी मनीषा कांबळे अशा दोघांना पोलिसांनी अटक केली होती.
दोघांविरुद्ध येथील न्यायालयात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले.त्यावर या खटल्याची सुनावणी सुरू होती.पीडित मुलींच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने हा इतक्या मोठ्या शिक्षेचा दणका आरोपींना दिला.सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शुभांगी पाटील आणि रणजित पाटील यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे आणि महिला पोलीस सूर्यवंशी यांनी खटल्याच्या कामकाजात मदत केली.