बलात्कारातील संशयितांची बडदास्त
By admin | Published: November 2, 2014 10:02 PM2014-11-02T22:02:49+5:302014-11-02T23:32:57+5:30
‘सिव्हिल’मधील प्रकार : संशयितांना मोबाईल; नातेवाईकांचा गराडा
सांगली : बांबवडे (ता. पलूस) येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तीन संशयितांचा वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली सांगलीच्या शासकीय रुग्णालयात बडदास्त ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. रविवारी सायंकाळी संशयितांभोवती नातेवाईकांनी गराडा घातला होता. पोलिसांच्या साक्षीने संशयित मोबाईलवर दिलखुलास गप्पा मारत होते.
संशयित पीडित मुलीचे जवळचे नातेवाईक आहेत. आईचे निधन झाले आहे. ती आजी व वडिलांसोबत राहते. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत संशयितांनी तिच्यावर गेले वर्षभर वेळोवेळी बलात्कार केला होता. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर संशयितांनी तिला वाऱ्यावर सोडले. दोन दिवसांपूर्वी ती शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. मुलीच्या तक्रारीवरून संशयितांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक केली होती. सध्या तिघेही पोलीस कोठडीत आहेत.
अरविंद पवार, पंकज पवार, सचिन जाधव या संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी पलूस पोलिसांनी रविवारी शासकीय रुग्णालयात आणले होते. आकस्मिक दुर्घटना विभागाबाहेरील बाकड्यावर तिघांना बसविले होते. सोबत एक पोलीसही बसला होता. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये एक महिलाही होती.
नातेवाईकांनी पोलिसांसमोर संशयितांना मोबाईल दिला होता. संशयित एकापाठोपाठ एक असे मोबाईलवर दिलखुलास गप्पा मारत बसले होते. नातेवाईकांशी त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या. दीड तास हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. गेले दोन दिवस संशयितांना रुग्णालयात आणले जात आहे. (प्रतिनिधी)
मुलीचे वडील शांत
पीडित मुलीचे वडील तिच्या देखभालीसाठी रुग्णालयात आहेत. या प्रकारामुळे त्यांना मानसिक धक्का बसला आहे. सायंकाळी तेही आकस्मिक दुर्घटना विभागाजवळ एका कोपऱ्यात बसून होते. संशयितांची पोलिसांनी ठेवलेली बडदास्त ते पाहत बसले होते.