मिरजेत तरुणीची अश्लील चित्रफीत काढून बलात्कार
By admin | Published: January 22, 2017 11:33 PM2017-01-22T23:33:52+5:302017-01-22T23:33:52+5:30
जिल्हा बँकेतील लिपिकास अटक : सात दिवसांची कोठडी
मिरज : मिरजेत तरुणीची अश्लील चित्रफीत काढून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या अमोल पुंडलिक
जगताप (वय २५, रा. पंचायत समिती कर्मचारी वसाहत मिरज) या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिकास
गांधी चौक पोलिसांनी अटक केली. अमोल जगताप यास न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी
दिली आहे.
अमोल जगताप याचे वडील जिल्हा परिषदेत नोकरी करीत असल्याने तो पंचायत समिती कर्मचारी वसाहतीत राहतो. २३ वर्षीय तरुणी अंघोळ करीत असताना, अमोल याने मोबाईलवर तिचे चित्रण केले होते. या चित्रणाच्या आधारे या तरुणीस ब्लॅकमेल करून अमोल याने तिच्यावर दोन वर्षे वारंवार बलात्कार केला.
दरम्यान संबंधित तरुणीचे लग्न ठरल्यानंतरही त्याने तिला त्रास दिला. तरुणीचे लग्न झाल्यानंतरही अमोल याने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करून धमकावले. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित तरूणीने गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली. गांधी चौक पोलिसांनी अमोल जगताप याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. (वार्ताहर)
आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलीने या त्रासाला कंटाळून ब्लेडने हाताच्या शिरा कापून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात आली. त्यांनी तिला धीर देऊन पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. संशयिताने वारंवार चित्रफीत सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. त्यास अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून, चित्रफीतही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.