सांगली जिल्ह्यात दुसऱ्यांदा सापडले दुर्मिळ 'ॲटलास मॉथ'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 07:27 PM2024-10-02T19:27:21+5:302024-10-02T19:28:09+5:30
विकास शहा शिराळा : जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "ॲटलास मॉथ" शिराळा येथील पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात ...
विकास शहा
शिराळा : जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "ॲटलास मॉथ" शिराळा येथील पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात दिसले होते. आज, बुधवारी पुन्हा असेच फुलपाखरू सोमवार पेठेत मरिमी चौकात दिसले. हे पतंग (फुलपाखरू) सकाळी आठ वाजलेपासून संध्याकाळी सात पर्यंत येथे लावण्यात आलेल्या पडद्यावर व नंतर भिंतीवर विसावले होते. याचे पंखाच्या टोकाला नागाच्या तोंड व आकार दिसत होता त्यामुळे शिराळ्यात नागाचे फुलपाखरू पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
शिवाजी गुरव, पूजा सावंत यांनी हे फुलपाखरू पाहिले. जवळपास दहा इंच मोठे हे पतंग होते. महत्त्वाचे म्हणजे याच्या दोन्ही पंखाच्या टोकाला नागाच्या तोंड व आकार दिसत होता. नागाचे फुलपाखरू असल्याची माहिती शहरात पसरताच पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. हे फुलपाखरू दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक आहे.
खास वैशिष्ट्य म्हणजे..
त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला "एॅटलास माॅथ" म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. याचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसाचे असल्याने या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारसा मागे ठेवून हे पतंग मरतात. शक्यतो रात्रीच दिव्यांचे प्रकाशाकडे आकर्षीत होणारे हे पतंगे निशाचर आहेत, क्वचितच ते दिवसा आढळतात.
'या' झाडांवरच आढळतो
सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात प्रकर्षाने ते दिसतात. हा पतंग दालचीनी, लींबू, जांभुळ, पेरू व लींबू वर्गीय झाडांवरच आढळतो. तिथेच त्याचे प्रणय व अंडी घालणे या क्रिया होतात. मादी एका वेळेस १०० ते २०० अंडी घालते. अंडी दहा ते चौदा दिवसांत उबवून त्यातून आळी बाहेर येते. हे आळी ३५ ते ४० दिवस सतत झाडांची पाने खातच राहते. एकविस दिवसांनंतर कोशातून पतंग बाहेर येते. त्यानंतर अंडी घालून पतंगा मरतो. अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेला हा दुर्मिळ जीव शक्यतो दक्षिण-पूर्व आशियात आढळतो.