राजस्थानच्या मुलीसाठी महाराष्ट्रातून विमानाने दुर्मीळ रक्तपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:33 AM2019-04-26T00:33:44+5:302019-04-26T00:33:44+5:30

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जन्मानेच पदरी आलेल्या रक्ताच्या नात्यांचा गोतावळा घेऊन त्याच चौकटीत रमणाऱ्या माणसांना ...

Rare blood supply to the girl from Rajasthan for the daughter of Rajasthan | राजस्थानच्या मुलीसाठी महाराष्ट्रातून विमानाने दुर्मीळ रक्तपुरवठा

राजस्थानच्या मुलीसाठी महाराष्ट्रातून विमानाने दुर्मीळ रक्तपुरवठा

googlenewsNext

अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जन्मानेच पदरी आलेल्या रक्ताच्या नात्यांचा गोतावळा घेऊन त्याच चौकटीत रमणाऱ्या माणसांना माणुसकीच्या रक्तातून नव्या नातेविश्वात घेऊन जाण्याचे काम ‘बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनमार्फत’ अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच भावनेतून राजस्थानमधील एका सोळावर्षीय शाळकरी मुलीला पुण्यातून विमानाने सहा तासात रक्त उपलब्ध करून देऊन तिचे प्राण वाचविले.
अत्यंत दुर्मिळ असलेल्या ‘बॉम्बे ओ’ या रक्तगटातील संपूर्ण देशभरातील लोकांची संघटना बांधण्याचे काम तासगाव (जि. सांगली) येथील विक्रम यादव यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात विविध राज्यांमधील तसेच परदेशातील रुग्णांचे प्राण त्यांनी त्यांच्या या संघटनेच्या माध्यमातून वाचविले आहेत. यात आणखी एका पुण्यकर्माची भर नुकतीच पडली. किशनगंज (जि. बारां, राजस्थान) येथील किशोरी मनभर या सोळावर्षीय मुलीला गावातील आरोग्य शिबिरातच अ‍ॅनिमिया आणि मलेरिया या दोन्ही आजाराने ग्रासल्याचे आढळले. तिला तातडीने कोटा शहरातील महाराव भीमसेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिच्या तपासणीत ‘बॉम्बे ओ’ हा दुर्मिळ रक्तगट तिच्यात आढळला. एकीकडे आजाराने ग्रस्त असताना, दुर्मिळ रक्तगट तिच्यात आढळल्याने डॉक्टरांची चिंता वाढली. तिचे हिमोग्लोबिनही ४ मिलिग्रॅमपर्यंत खाली आले होते.
राजस्थानसह शेजारील अन्य राज्यांमध्ये त्यांनी चौकशी केली असता, हा रक्तगट त्यांना कुठेच आढळून आला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनच्या हेल्पलाईन क्रमांकावरून सांगलीच्या विक्रम यादव यांच्याशी संपर्क साधला आणि सहा तासात मुलीला रक्त हवे असल्याचे सांगितले. यादव यांनी आपली यंत्रणा कार्यान्वित केली. पुण्यातील रक्तदाते मेधा वैद्य आणि प्रतीक माथी या दोघांना त्यांनी पुण्यातच रक्तदान करण्यास सांगितले. विमानाने ते रक्त जयपूरपर्यंत नेले आणि तिथून कारने कोटा येथील हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले. वेळेत रक्त पोहोचल्यामुळे किशोरी मनभरचे प्राण वाचले.
विक्रम यादव यांनी डॉक्टरांमार्फत या मुलीशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधला आणि तिची चौकशीही केली. या मुलीने यादव यांना धन्यवाद दिले. तिच्या चेहºयावर फुललेले हसू डॉक्टरांच्या मनातील समाधानाच्या लाटांना उधाण आणणारे ठरले. हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. एच. एल. मीणा यांनीही यादव, वैद्य आणि माथी यांना धन्यवाद दिले.
काय आहे ‘बॉम्बे ब्लड’
मुंबईमध्ये १९५२ मध्ये वाय. एम. भेंडे नावाच्या डॉक्टरनी या रक्तगटाचा शोध लावला होता. पूर्वी मुंबईला बॉम्बे म्हटले जायचे. म्हणून या शहराचेच नाव रक्तगटाला देण्यात आले. हा सर्वात दुर्मिळ रक्तगट मानला जातो. याचे जगभरातील प्रमाण 0.000४ इतके आहे. या रक्तगटातील व्यक्तीचे रक्त अन्य लोकांना चालते, मात्र या लोकांना त्यांच्याच गटाचे रक्त लागते. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांसाठी सहजासहजी हे रक्त उपलब्ध होणे कठीण असते. त्यामुळेच यादव यांनी देशभरातील अशा गटातील लोकांची संघटना बांधली आहे. त्याचा हेल्पलाईन क्र. ९९७00१८00१ हा आहे.

खर्च नव्हे, जीव महत्त्वाचा : विक्रम यादव
गेल्या काही वर्षांपासून पदरमोड करून रुग्णांचे प्राण वाचविण्याचे काम बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशन व त्यांचे रक्तदाते करीत आहेत. राजस्थानला रक्त पाठविण्याचा खर्चही संघटनेनेच केला. याविषयी यादव म्हणाले की, खर्चापेक्षा एखाद्याचा जीव महत्त्वाचा असतो. चांगल्या विचाराचे रक्तदाते आम्हाला लाभल्यामुळे या गोष्टी शक्य होत आहेत.
यांनी केली धडपड...
रक्त पोहोचविण्याच्या मोहिमेत विक्रम यादव यांच्यासह हरजिंदर सिंह, सचिन सिंगला, अलोक पदकर, सागर पंडित, पुणे जनकल्याण रक्तपेढीचे संतोष अनगोळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Web Title: Rare blood supply to the girl from Rajasthan for the daughter of Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.