सांगलीतील अनुगडेवाडीत आढळला दुर्मिळ 'मलबारी मैना'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 06:19 PM2023-11-13T18:19:57+5:302023-11-13T18:20:28+5:30
नर-मादी दोघेही पिलांची काळजी घेतात
किरण सावंत
सावंतपूर: महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ असणारा मलबारी मैना हा पक्षी पलूस तालूक्यातील अनुगडेवाडी आमणापूर परिसरात आढळला. अनुगडेवाडी येथील काळ्या ओढ्यावरील पूलाच्या परिसरात पिंगळा घुबड, मलकोवा, सुभग, शिंजीर, निखार, राखी धनेश अशा दुर्मिळ पक्षांचे दर्शन झाले आहे. यंदा प्रथमच या परिसरात मलबार मैनाची नोंद झाली आहे. पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी त्यांची नोंद केली.
मलबारी मैना किंवा करड्या डोक्याची मैना आशिया खंडातील बहुतेक देशात आढळतात. ईशान्य भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि वायव्य बर्मा दक्षिण चीन, तैवान, बर्मा, थायलंड, लाओस, व्हिएतनाम आणि कंबोडिया आदि देशात हा पक्षी आढळतो. भारत आणि इंडोचीनच्या मैदानी आणि टेकड्यांवर राहतात. हिवाळ्यात हिमालयातील तळभागातून ते काठमांडू खोऱ्यात जातात. समुद्रसपाटीपासून 800 मीटरच्यावर डोंगराळ प्रदेशात हे पक्षी आढळत नाहीत. शहरी भागात या पक्ष्याचा वावर सामान्य असला तरी ते विरळ झाडे व जंगली भागात असलेल्या मोकळ्या जागेत वावरतात.
हे पक्षी थव्याने वावरतात. कीटक जसे वाळवी, सुरवंट माश्या, फळे, परागकण आणि वनस्पतींचे फुले खातात. प्रथम दर्शनी ब्रामणी मैनासारखा वाटणारा हा गाणारा पक्षी आहे. लांबी 20 सेमी असते. शरीराचा वरचा भाग राखाडी असतो. पंखांचा व शेपटीचा रंग काळा असून डोक्यावर राखाडी रंगाची पिसे असतात. चोच लहान असून डोळ्याची बूबले पांढरी असतात. चोच फिक्कट निळी व पिवळी असते.
नर-मादी दोघेही पिलांची काळजी घेतात
विणीचा हंगाम सामान्यतः फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून जूनपर्यंत असतो. ३ ते १२ मीटर उंचीवर झाडाच्या पोकळीत घरटे बांधतात. ते सुतार पक्षी किंवा बार्बेट्सची जुनी घरटी वापरतात. मादी एकावेळी निळ्या हिरव्या रंगाचे ठिपके असलेली 3-5 अंडी घालते. नर-मादी दोघे मिळून घरटे बांधतात व आळीपाळीने १५ ते १७ दिवस अंडी उबवतात. नर-मादी दोघे ही पिलांना भरवतात व पिलांची काळजी घेतात. पिल्ले 19-21 दिवसांत भरारी घेण्यास सज्ज होतात.