सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आढळला दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:39+5:302021-06-02T04:21:39+5:30

विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : कोयना परिसरातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात ग्रिफॉन गिधाडापाठोपाठ आता दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ (बेडूकतोंड्या ...

Rare Sri Lankan Frog Mouth Found in Sahyadri Tiger Reserve | सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आढळला दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आढळला दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ

googlenewsNext

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : कोयना परिसरातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात ग्रिफॉन गिधाडापाठोपाठ आता दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ (बेडूकतोंड्या पक्षी) सापडला आहे. या दुर्मिळ पक्ष्याच्या वास्तव्याने पक्षीमित्रांत आनंदाचे वातावरण आहे.

सहसा दिवसा नजरेस न पडणारा दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ पहिल्यांदाच कोयना अभयारण्य तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पक्षी निरीक्षकांना आढळून आला. कोयना परिसरातील स्थानिक व ‘डिस्कव्हर कोयना टीम’चे सदस्य पक्षिमित्र संग्राम कांबळे, निखिल मोहिते, नरेश शेलार, संकेत मोहिते, महेश शेलार शेतात कामे करत असताना छंद म्हणून पक्षी निरीक्षण करत असतात. गुरुवारी संग्राम कांबळे, निखिल मोहिते शेतात काम करत असताना संध्याकाळच्या वेळीला शेजारील जंगलातून अनोखा आवाज ऐकू आला. यावेळी आजूबाजूला त्यांनी शोध घेतला असता दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ (बेडूकतोंड्या पक्षी) झाडावर नजरेस पडला.

हा पक्षी निशाचर असून त्याचे शास्त्रीय नाव Batrachostomus moniliger असे असून तो खाद्य शोधासाठी रात्रीच बाहेर पडतो. दिवसा घनदाट जंगलात विश्रांती घेत असतो. साधारणपणे याच्या शरीराची लांबी २२ ते २४ सेंटीमीटर असते. कीटक हे त्याचे आवडते खाद्य आहे. पक्ष्याचा संपूर्ण शरीराचा रंग वाळलेल्या लाकडाच्या सालीसारखा राखाडी असतो. मादी बदामी रंगाची असते. पंखाच्या बाजूने व पाठीमागे बदामी रंगावर पांढरे ठिपके असतात. बेडकाच्या तोंडासारखा असल्याने त्याला मण्डूक मुखी किंवा बेडूकतोंड्या पक्षी असेही म्हणतात. त्याचा रंग आणि आकार निसर्गाशी इतका मिळता जुळता आहे की, तो सहजपणे ओळखून येत नाही. फ्रॉग माउथ वन्यजीवांच्या वर्गवारीमध्ये वन्यजीव कायदा १९७२ संरक्षण कायद्यानुसार क्रमांक एकच्या यादीत येतो. या वर्ग यादीमध्ये वाघ, अजगर, पिसोरी धनेशसारखे दुर्मिळ वन्यजीव येतात.

डिस्कव्हर कोयना टीम

पक्षी अभ्यासकांसाठी जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील काही मोजक्याच अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून गणलेले पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्रप्रकल्प वन्यजीव प्राणी, पक्षी यांच्यासाठी राखीव असल्याने येथे अनेक संशोधक येतात व स्थानिकांच्या मदतीने संशोधन करतात. अशा संशोधनाची हळूहळू स्थानिक तरुणांना आवड निर्माण झाल्याने त्यांनी एकत्र येऊन ‘डिस्कव्हर कोयना टीम’ची निर्मिती केली. सह्याद्री फौंडेशन संस्थेमार्फत ते अशा प्रकारचे संशोधन निरीक्षण, अभ्यास स्वत: करू लागले. भविष्यात कोयना भागातील वनपर्यटन नक्कीच जागतिक दर्जाचे होईल, असे या संस्थेमधील संग्राम कांबळे, निखिल मोहिते, महेश शेलार, संकेत मोहिते, नरेश शेलार, सागर जाधव या सदस्यांनी सांगितले.

Web Title: Rare Sri Lankan Frog Mouth Found in Sahyadri Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.