पक्षीय नेतृत्वाच्या संधीचा पिता-पुत्रांचा दुर्मिळ योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:59 PM2018-04-29T23:59:57+5:302018-04-29T23:59:57+5:30
सांगली : राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या राजारामबापू पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत जयंत पाटील यांनीही आपली स्वतंत्र छाप पाडली. राजारामबापूंनी काँग्रेस व जनता पक्ष अशा वेगवेगळ्या पक्षांचे राज्याचे नेतृत्व केले. आता जयंत पाटील यांच्याहाती राष्टÑवादीच्या राज्याच्या नेतृत्वाचे दोर आल्याने, पिता-पुत्रांना अशाप्रकारे राज्यस्तरावर पक्षीय नेतृत्व करण्याची संधी मिळण्याचा दुर्मिळ योग नोंदला गेला आहे.
राजारामबापू पाटील यांनी १९५९ मध्ये प्रदेश काँगे्रसचे आणि १९७७ मध्ये जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले. त्यानंतर पुन्हा १९८0 ला त्यांची फेरनिवड झाली होती. राज्याच्या मंत्रिमंडळातही महत्त्वाची खाती भूषविताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजनाही अस्तित्वात आणल्या. राज्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव प्रदीर्घकाळ राहिला. त्यांच्या पश्चात जयंत पाटील यांनीही त्याचपद्धतीने आपली वाटचाल केली. संस्था उभारून संघटन बळकट करण्याच्याबाबतीत त्यांनी अधिक प्रभावी काम केले. सलग सहावेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा पराक्रमही त्यांनी केला. अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले. विशेष म्हणजे अर्थ व ग्रामविकास ही दोन्ही खातीही राजारामबापूंनी सांभाळली होती. याच काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले होते. अगदी राजारामबापू पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकताना जयंत पाटील यांनीही आपली छाप पाडली. केवळ कर्तृत्ववान पित्याच्या पोटी जन्म घेऊन त्यांच्या कार्याच्या भांडवलावर मोठे होण्याचा प्रयत्न कधीच जयंत पाटील यांनी केला नाही. त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही मिळाले.
त्रिमूर्तींच्या नावे : योगायोग नोंदला...
सांगली जिल्ह्यातील पतंगराव कदम, आर. आर. पाटील आणि जयंत पाटील हे राज्यातील राजकारणातील त्रिमूर्ती म्हणून परिचित होते. एकाचवेळी मंत्रिमंडळात जिल्ह्याच्या या तिन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभाव टाकला. तिघांची वक्तृत्वशैली वेगळी असली तरी, ती प्रभावी ठरली. तिघांनीही मोठी खाती सांभाळली. आर. आर. पाटील यांनी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्षपद, पतंगराव कदम यांनी काँग्रेसचे प्रभारी प्रदेशाध्यक्षपद यापूर्वी भूषविले होते. आता जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे तिन्ही नेत्यांच्या नावे पक्षीय नेतृत्वाचीही नोंद झाली आहे. आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम आता हयात नसल्याने जयंत पाटील भाजपविरोधात एकाकी लढत आहेत.