आरवडेत भाजपविरोधात राष्ट्रवादी--आबा-काका गटात संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:14 AM2017-09-22T01:14:43+5:302017-09-22T01:15:14+5:30
मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद खुले असल्याने चुरस निर्माण झाली आहे.
संजयकुमार चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद खुले असल्याने चुरस निर्माण झाली आहे. इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजअखेर गावातील दोन स्थानिक गटांत संघर्ष आहे. त्यांच्यात कधीच समझोता झालेला नाही. आताही मोठा संघर्ष पाहावयास मिळणार आहे.
आरवडेमध्ये चार प्रभाग असून, ३३०० मतदार आहेत व ११ सदस्य व १ सरपंच अशी १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या गावाची निवडणूक लक्षवेधी असते. हे संवेदनशील गाव आहे. गावात आर. आर. पाटील आबा विरुद्ध खासदार संजयकाका पाटील या दोन गटांचा टोकाचा संघर्ष आहे. परंतु मागील दोन वर्षात राजकारणात उलथापालथ झाली आहे. ग्रामपंचायतीवर गेली २० वर्षे खासदार गटाची सत्ता होती; परंतु या गटातील प्रमुख युवराज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी लोकसभेपूर्वी आर. आर. पाटील गटात प्रवेश केला. त्यामुळे खासदार गटाची ग्रामपंचायतीवरील सत्ता संपुष्टात आली.
एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या संभाजी मस्के, संदीप चव्हाण, संतोष पाटील, बालाजी पाटील, सुदाम पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी खासदार गटात प्रवेश केला. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साह संचारला आहे. खासदार पाटील यांनी हे गाव सांसद आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतल्याने विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे पाटील यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. त्यांनी यासाठी ताकद दिली आहे.
ग्रामपंचायतीतील विरोधी गटाचे नेतृत्व संभाजी मस्के, राजू साहेब, बाळासाहेब शिंदे, संतोष पाटील करत आहेत. त्यांनी यावेळी सत्ताधारी गटापुढे मोठे आव्हान उभे केले आहे व सत्ता उलथवून लावण्याचा निर्धार केला आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य युवराज पाटील व प्रकाश पाटील करत आहेत. सत्ताधारी गटातील बरीच नाराज मंडळी तसेच खासदार निष्ठावंतांनी विरोधी गटात प्रवेश केला असल्याने सत्ताधारी गटात अस्वस्थता आहे.
दोन्ही गटात आरक्षित जागेसाठी असणाºया उमेदवारांसाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे उमेदवार देताना दोन्ही गटाची डोकेदुखी झाली आहे. प्रभागवार बैठका सुरू आहेत.
निवडणुकीची चर्चा : जोरात
विरोधक मागील २० वर्षांत ग्रामपंचायतीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन जनतेपुढे जात आहेत, तर सत्ताधारी केलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत आहेत. निवडणुकीची चर्चा परिसरात जोरात होत आहे.