सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून थापल्या भाकऱ्या, राष्ट्रविकास सेनेकडून महागाईचा निषेध
By शरद जाधव | Published: March 9, 2023 08:05 PM2023-03-09T20:05:35+5:302023-03-09T20:06:09+5:30
शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलकांनी दिल्या घोषणा
सांगली : राज्यातील जनता महागाईचा सामना करत होरपळून निघत आहे. खाद्यतेलातील दरवाढ, डिझेल, पेट्रोलचे दर वाढ झाल्याने सर्वसामान्यांना अडचणी येत आहेत. यातच केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे दर वाढवले आहेत. याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले. महिलांनी चूल पेटवून भाकरी थापत शासनाचा निषेध केला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिलिंडर विकत घेणे परवडत नसल्यामुळे चुली पेटवल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळेच वाढती महागाई व गॅस, तेलाचे वाढलेले दर कमी करावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलकांनी घोषणा दिल्या. महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच चूल पेटवून भाकऱ्या थापून निषेध केला.
यावेळी प्रशांत सदामते, आयुब पटेल, रोहन कोळी, विनोद मोरे, विक्रम मोहिते, वर्षा कोळी, लालासाहेब माने, सुजाता हेगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.