कापराच्या दराने ग्राहकांच्या अंगात भरले कापरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 04:58 PM2020-08-24T16:58:11+5:302020-08-24T17:04:53+5:30
गणेशोत्सवात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कापराच्या दराने यंदा विक्रम केला आहे. साधा कापूर १ हजार २00 रुपये तर भीमसेनी कापूर २ हजार रुपये किलोंवर गेला आहे. कापराचे गगनाला भिडलेले दर ऐकून ग्राहकांच्या अंगात कापरे भरत आहेत.
अविनाश कोळी
सांगली-गणेशोत्सवात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कापराच्या दराने यंदा विक्रम केला आहे. साधा कापूर १ हजार २00 रुपये तर भीमसेनी कापूर २ हजार रुपये किलोंवर गेला आहे. कापराचे गगनाला भिडलेले दर ऐकून ग्राहकांच्या अंगात कापरे भरत आहेत.
राज्यभरात दरवर्षी गणेशोत्सवात कापराची मोठी आवक होते. यंदा कोरोना काळात मुंबईचा घाऊक व्यापार विस्कळीत झाला आहे. कापूर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवरही परिणाम झाला आहे. कामगारांची अपुरी संख्या, लॉकडाऊन काळात ठप्प झालेला उद्योग यामुळे कापराचे यंदा मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे.
सागंलीच्या बाजारात मागणीच्या तुलनेत केवळ ६0 टक्के पुरवठा आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे. कापराच्या दराने मोठा विक्रम केला आहे. त्यामुळे कापूर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. १ किलो काजूपेक्षाही कापूर महाग झाला आहे. श्रावणातील उत्सव, भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव, त्यापाठोपाठ येणारा नवरात्रोत्सव यामुळे आगामी दोन महिने कापराची मागणी कायम असणार आहे.
मागील वर्षीपेक्षा अधिक दर
गेल्या तीन वर्षात कापराचे दर वाढतच आहेत. गतवेळी साधा कापूर ९00 ते ९५0 रुपये किलोे होता. यंदा त्यात तिनशे रुपयांची वाढ झाली आहे. भीमसेनी कापराचा दर मागील वर्षी १ हजार रुपये किलो होता. यंदा तो २ हजारावर गेला आहे. म्हणजेच भीमसेनी कापूरचा दर दुप्पट झाला आहे.
भीमसेनी कापूर हा आरोग्यासाठी चांगला असल्याचे मानले जाते. त्यावर मतमतांतरे असली तरी कोरोना काळात खोकला, सर्दीवर घरगुती उपाय म्हणून यास मागणी वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी भीमसेनी कापूर जाळला जात आहे. मागणीत मोठी वाढ झाल्याने त्याचे दरही आता गगनाला भिडले आहेत.
का वाढताहेत दर
- कोरोनामुळे लॉकडाऊन काळात उत्पादनावर मोठा परिणाम
- मोठा पुरवठादार असलेल्या मुंबई शहरातील यंत्रणा विस्कळीत
- वाहतुकीचा खर्च वाढला
- उत्सवामुळे मागणी वाढली
- कोरोना काळात आयुर्वेदिक उपाय म्हणूनही मागणीत वाढ
- मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी पुरवठा
गेल्या तीन वर्षापासून कापराचे दर वाढत आहेत. यंदा सर्वाधिक दर असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. सध्याची स्थिती पाहता हे दर लवकर सामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता नाही. त्यामुळे महागड्या दरानेच कापराची खरेदी ग्राहकांना करावी लागणार आहे.
एम. युसुफ,
विक्रेते, सांगली