उसाचा दर ठरेना, गुळाला दर मिळेना!
By admin | Published: December 10, 2014 10:49 PM2014-12-10T22:49:37+5:302014-12-10T23:44:42+5:30
शेतकरी हवालदिल : आंदोलने शमल्याने गळीत हंगाम जोमात
पुनवत : प्रतिवर्षी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामादरम्यान अनेक शेतकरी संघटनांकडून ऊस दरासाठी केली जाणारी आंदोलने यंदा शमली आहेत. परिणामी यंदाच्या हंगामात उसदराची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. गळीत हंगामास जवळपास महिना उलटून गेला, तरी उसाचा दर ठरलेला नाही, तर दुसरीकडे वारणा पट्ट्यात चालू असलेल्या गुऱ्हाळघरातील गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कात्रीत सापडला असून, ना नफा, ना तोटा या तत्त्वावर अनेक शेतकऱ्यांनी उसावर कोयता चालवला आहे.
सध्या जिल्ह्यात साखर कारखाने जोमात सुरू झाले आहेत, तर शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील गुऱ्हाळघरांमध्ये चिमण्याही पेटल्या आहेत. साखर आणि गुळाचे उत्पादन सुरू आहे. साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची हवा असायची. ऊसदरासाठी हे दोन्ही घटक रस्त्यावर उतरायचे, मात्र यंदा साखर कारखाने सुरू होऊन महिना उलटला, तरी उसाचा अधिकृत दर ठरलेला नाही. शेतकरी उसदराच्या प्रतीक्षेत असताना काँग्रेस सरकारच्या काळात भांडणाऱ्या शेतकरी संघटना यावर्षी कुठे गेल्या, असा सवालही शेतकरी करीत आहेत.
दुसरीकडे वारणा पट्ट्यातील गुळाला प्रतिक्विंटल तीन हजाराच्या आसपासच दर मिळत असल्याने शेतकरी तोट्यात जात आहेत. शेतकऱ्याच्या एका आदणाला सुमारे अडीच क्विंटल गूळ पडला तर त्या गुळाचे ९ ते १० हजार रुपये होतात. त्यातून गुऱ्हाळभाडे २०००, वाहतूक, हमाली, तोलाई, दलाली, खते व मशागतीचा खर्च वजा केल्यास एका आदणाला ३००० रुपयेच मिळतात. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. (वार्ताहर)
गुळाला अच्छे दिन येणार?
एकीकडे ऊसदर अद्याप जाहीर झाला नसल्याने दुसरीकडे गुळालाही हा दर मिळेनासा झाला आहे. उसाचा दर निश्चित झाल्यानंतर गुळाला ‘अच्छे दिन’ यायला मदत होणार, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी सध्या शेत मोकळे करण्यासाठी कोयता चालवला आहे.