अडीच हजार कुटुंबांचे रेशन, पाणी बंद

By admin | Published: August 24, 2016 11:11 PM2016-08-24T23:11:13+5:302016-08-24T23:48:18+5:30

वैयक्तिक शौचालय योजना : महापालिकेकडून कारवाई सुरू

Ration of 2,500,000 families, water closure | अडीच हजार कुटुंबांचे रेशन, पाणी बंद

अडीच हजार कुटुंबांचे रेशन, पाणी बंद

Next

सांगली : महापालिका हद्दीतील सुमारे अडीच हजार कुटुंबांना वारंवार विनंती करूनही वैयक्तिक शौचालये बांधलेली नाहीत. यातील २६६ जणांनी तर पालिकेकडून शौचालयाचे अनुदानही उचलले आहे. त्यामुळे आता महापालिकेने या अडीच हजार कुटुंबांचे धान्य, वीज, पाणी व गॅस बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी बुधवारी पालिकेच्या आरोग्य विभागाला तसे आदेशही दिले.
आयुक्त खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून स्वच्छतेच्या कामाला महत्त्व दिले आहे. खुद्द आयुक्तांनी शहरातील झोपडपट्ट्यात स्वच्छता मोहीम राबवून नव्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. त्यात शासनाकडूनही स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीचे आदेश पालिकेला प्राप्त झाले आहे. बुधवारी दुपारी आयुक्तांनी सर्व स्वच्छता निरीक्षक, वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत वैयक्तिक शौचालय योजनेचा आढावा घेण्यात आला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त खेबूडकर म्हणाले की, महापालिका हद्दीतील २६६ जणांनी शौचालयाचे अनुदान घेतले आहे. पहिला सहा हजाराचा हप्ता देऊनही या कुटुंबांनी अजून बांधकाम सुरू केलेले नाही. गेल्या आठ महिन्यांपासून ही प्रक्रिया रखडली आहे.
मध्यंतरी या कुटुंबांना १५ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण तरीही त्यांनी शौचालये बांधलेली नाहीत. या कुटुंबाना एकूण १६ लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. पालिकेकडून या कुटुंबावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी चालविली होती. शहरात अजून दोन हजार कुटुंबे उघड्यावर शौचालयास जात आहेत. त्याची यादीही आरोग्य विभागाकडे तयार आहे. या सर्व कुटुंबांचे पाणी कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
ही प्रक्रिया लवकरच पाणीपुरवठा विभागाकडून सुरू होईल. वीज मंडळ व गॅस एजन्सीला पत्र देऊन या कुटुंबाचे वीज व गॅस बंद करण्याची विनंती केली जाणार आहे. शिवाय जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र देऊन स्वस्त धान्य दुकानातील धान्य पुरवठाही रोखला जाणार आहे. पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना तातडीने पत्र तयार करून ते संबंधित विभागाला पाठविण्याचे आदेशही दिल्याचे खेबूडकर यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)


दोन महिन्यात दुप्पट प्रतिसाद
आयुक्त खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. वैयक्तिक शौचालय योजनेचाही वारंवार आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम समोर येऊ लागला आहे. गेल्या दोन महिन्यात नवीन ७०० शौचालये बांधली गेली असून, वैयक्तिक शौचालयात दुपटीने वाढ झाली आहे.

महिलांसाठी २६ ठिकाणी स्वच्छतागृहे
महापालिका हद्दीत महिला स्वच्छतागृहाची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. त्याची दखल घेत आयुक्त खेबूडकर यांनी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यास प्राधान्यक्रम दिला आहे. सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरातील आठवडा बाजार व मुख्य बाजारपेठेत २६ जागी स्वच्छतागृहे उभारली जाणार असून, त्यांची जागा निश्चितीही केली आहे. याबाबत आतापर्यंत प्रशासकीय स्तरावर दोन बैठकाही झाल्या आहेत. त्याशिवाय काही व्यावसायिकांशी संपर्क साधण्यात आला आहे. बाजारपेठेत नव्याने संकुल उभे रहात असेल तर, त्याठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, असे आवाहनही केले आहे.

Web Title: Ration of 2,500,000 families, water closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.