रेशनचे मोफत धान्य होणार बंद, 'या' महिन्यापासून मोजावे लागतील पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 01:48 PM2021-11-15T13:48:17+5:302021-11-15T13:50:04+5:30
कोरोना काळात हातावरचे पोट असलेल्या लोकांची भागविली होती भूक. हे धान्य आता नोव्हेंबरअखेरपर्यंत मोफत मिळेल.
सांगली : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक साहाय्यांतर्गत रेशनवर मोफत धान्याचा पुरवठा केला जातो. अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असणाऱ्या अंत्योदय योजनेतील व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू व तांदूळ विनाशुल्क मिळते. हे धान्य आता नोव्हेंबरअखेरपर्यंत मोफत मिळेल. त्यानंतर मात्र विकत घ्यावे लागणार आहे.
जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय योजनेच्या ३१ हजार ३२८ शिधापत्रिका आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेत ३ लाख ७५ हजार ७९ लाभार्थी आहेत. एकूण ४ लाख ६ हजार ४०७ शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळतो. लाभार्थी लोकसंख्या १८ लाख ४७ हजार ४८० इतकी आहे. प्राधान्य कुटुंबांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत दिला जातो. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना २५ किलो गहू व १० किलो तांदूळ मिळतो.
जिल्ह्यातील एकूण रेशनकार्ड धारक ६६९८१६
अंत्योदय ३१३२८
प्राधान्य कुटुंब ३७५०७९
आता केवळ नियमित धान्य मिळणार
नोव्हेंबरअखेरपर्यंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य पुरवठा होईल. त्यानंतर मात्र योजना बंद होणार आहे. लाभार्थ्यांना त्यासाठी पैसे द्यावे लागतील. अंत्योदय प्रवर्गातील लाभार्थी कुटुंबांना दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ घ्यावा लागेल.
१८ लाख लोकांना मिळाले मोफत धान्य
- अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असणाऱ्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील १८ लाख ४७ हजार ४८० लाभार्थ्यांना गहू व तांदूळ विनाशुल्क मिळाले.
- कोरोना काळात रोजगार गमावलेल्या कुटुंबांचा चरितार्थ या धान्यातून झाला. विशेषत: हातावर पोट असणाऱ्यांची भूक धान्याने भागविली.
कोविडकाळात मोफत धान्याने तारले
कोरोना व लॉकडाऊनमुळे कंपनीचे कामकाज बंद झाले. सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. नोकरी गेल्याने पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता. रेशनवरील मोफत धान्याने कसाबसा चरितार्थ चालविला. आता कंपनी पुन्हा सुरू झाल्याने मोफत धान्याची गरज राहिलेली नाही. - सिकंदर शिकलगार, लाभार्थी
गहू आणि तांदूळ मोफत मिळाले. सरकारने रेशनवर डाळी, तेल व साखरही अल्पदरात उपलब्ध करण्याची गरज होती. धान्य मिळाले, तरी अन्य गरजांसाठी धडपड करावी लागली. तरीही रेशनवरील मोफत धान्याने मोठा दिलासा दिला. - लहू पाथरवट, लाभार्थी
धान्य खुल्या बाजारात
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रोजगाराचे मार्ग उपलब्ध झाले. या काळात रेशनवरील धान्य मोठ्या प्रमाणात खुल्या बाजारात विकले गेले. विशेषत: वाळवा, पलूस, सांगली, मिरज आदी सधन भागात लाभार्थ्यांनी रेशनच्या धान्याची खुल्या बाजारात विक्री केली.