तासगावात काबील निष्ठेने राष्ट्रवादी रईस

By admin | Published: February 24, 2017 11:47 PM2017-02-24T23:47:09+5:302017-02-24T23:47:09+5:30

मतदारच ‘राजा’ : भाजपचा फुगा फुटला; खासदार संजयकाका पाटील स्वत:च्या तालुक्यात बॅकफूटवर

Rationalist Rais | तासगावात काबील निष्ठेने राष्ट्रवादी रईस

तासगावात काबील निष्ठेने राष्ट्रवादी रईस

Next



दत्ता पाटील ल्ल तासगाव
निवडणुकीत मतदारच राजा असतो, हे पुन्हा एकदा तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सिध्द झाले. राष्ट्रवादीत पडझड होत असताना आणि प्रभावी नेतृत्व नसतानादेखील, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या मतदारांनीच भाजपचा फुगा फोडला. त्यामुळे सत्तेचा वारु चौफेर उधळत असलेल्या खासदारांना येथे बॅकफूटवर जावे लागले, तर तालुक्यातील मतदारांची निष्ठाच काबील असल्यामुळे राष्ट्रवादी मात्र रईस झाली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून तालुक्यात जोरदार मोर्चेबांधणी झाली. राष्ट्रवादीतून अनेक पदे भोगणाऱ्या आणि आर. आर. पाटील यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचा रस्ता धरला. काहींनी तळ्यात-मळ्यातची भूमिका घेतली, तर काहींनी सक्रिय राजकारणातून फारकत घेतली. परिणामी तालुक्यात भाजपची आणि खासदार संजयकाकांची लाट निर्माण झाली. या लाटेमुळे राष्ट्रवादीचे उमेदवारदेखील हबकून गेले होते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राहणार का? असाच प्रश्न उपस्थित होत होता. मात्र मतदारांना गृहीत धरुन नेत्यांनी केलेले संधिसाधू राजकारण मतदारांना पचनी पडले नसल्याचे मतपेटीतून दिसून आले. भाजपकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना, तर राष्ट्रवादीशी सोडचिठ्ठी घेणाऱ्या कारभाऱ्यांकडून त्यांच्या हक्काच्या मतदारांना गृहीत धरुन घेतलेल्या नव्या घरोब्याच्या निर्णयाला मतदारांनी मतपेटीतून चपराक दिली. या निकालाने भाजपच्या वर्चस्वाचा फुगा फुटला असून, खासदार गट पुन्हा बॅकफूटवरच राहिला आहे.
सावळज गटात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात नाराजीचे मोठे धक्के बसले असतानादेखील, या गटातील मतदारांनी सर्वाधिक मताधिक्य देऊन आबांच्या बालेकिल्ल्याचा लौकिक कायम ठेवला.
मांजर्डेत राष्ट्रवादीच्या उमेदवारीची घोडचूक राष्ट्रवादीच्या अंगलट आली, तर राष्ट्रवादीअंतर्गत बंडाळीचा भाजपने फायदा घेत जिल्हा परिषदेची जागा पदरात पाडून घेतली. मणेराजुरी हा देखील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम राहिला. मात्र सावर्डे येथील भाजपशी फारकत घेतलेल्या दिलीप पाटील यांच्या गटाची पंचायत समितीची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडली. चिंंचणीत डी. के. पाटील यांच्या भाजपमधील उमेदवारीने दिनकरआबा घराण्यातील संघर्ष टळला. त्यामुळे ही जागा एकहाती भाजपच्या पदारात पडली. विसापुरात राष्ट्रवादीशी फारकत घेऊन भाजपमधून रिंगणात उतरलेल्या सुनील पाटील यांना मतदारांनी नाकारले. किंबहुना काही गावांत खासदारांची हक्काची व्होट बँक असतानादेखील, मिळालेली कमी मते चर्चेचा विषय ठरला.
येळावी गटात विजय निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरलेले येळावी गाव खासदारांचा बालेकिल्ला होता. मात्र याठिकाणीही राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांनी मताधिक्क्य मिळविण्याची किमया केली. लोकसभा निवडणुकीपासून खासदार संजयकाका पाटील यांचा वारु सुसाट होता. नगरपालिका निवडणुकीत तासगाव पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. त्यामुळे यावेळी पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा फडकणार, हे निश्चित मानले जात होते. मात्र मतदारांनी संधिसाधू राजकारणाला चपराक देत, निष्ठा जोपासल्यामुळे जिल्ह्यात भाजप सुसाट असतानाही तालुक्यात त्यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे खासदारांना बदलत्या राजकीय शैलीचे आत्मचिंंतन करायला हवे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी हे यश दिलासा देणारे असले तरी, नेत्यांपेक्षा मतदारांचा मोठा वाटा यात आहे. पंचायत समितीत मिळालेला निसटता विजय ही धोक्याची घंटा आहे. केवळ निष्ठेचे राजकारण फार काळ चालणारे नाही. निष्ठा दाखविलेल्या मतदारांना कामाची पोहोच मिळायला हवी.

Web Title: Rationalist Rais

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.