रावण, कंस, महिषासूर, दाभोळकर, कोकाटे फाडायचेच असतात; शरदबुवा घाग यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 06:13 PM2023-05-08T18:13:04+5:302023-05-08T18:13:24+5:30

जाहीर वक्तव्य करत समाजात विद्वेष निर्माण करण्याची कृती केल्याने खळबळ

Ravana, Kansa, Mahishasur, Dabholkar, Kokate are meant to be torn apart; Controversial statement of Sharadbuwa Ghag | रावण, कंस, महिषासूर, दाभोळकर, कोकाटे फाडायचेच असतात; शरदबुवा घाग यांचे वादग्रस्त वक्तव्य

रावण, कंस, महिषासूर, दाभोळकर, कोकाटे फाडायचेच असतात; शरदबुवा घाग यांचे वादग्रस्त वक्तव्य

googlenewsNext

सांगली : त्या हिरण्यकश्यपूचं काय होतं हो, फाडतात त्याला हो, असे कितीतरी विष्णूंच्या विरोधात उभे राहणारे होते. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण, कंस, महिषासूर, दाभोळकर, कोकाटे फाडायचेच असतात. जन्मकाळात नुसता सुंठवडा खाऊन नाही जायचं, काहीतरी ठरवून जायचं, असे विद्वेष पसरवणारे वक्तव्य नरसिंहवाडी (जि. कोल्हापूर) येथील शरदबुवा घाग या महाराजांनी केले आहे.

आज देशभरात सगळीकडे जाती-धर्मात विष कालविणाऱ्या संप्रदायिकतेचा आगडोंब उसळलेला असतानाच सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारकांचा आणि समाजसुधारकांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर या गावातील श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह तीर्थ मंदिराच्या श्री लक्ष्मी नृसिंह जयंती महोत्सवात शरदबुवा घाग या महाराजांनी हे द्वेषपूर्ण वक्तव्य केले. त्याची चित्रफित सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

वाळवा तालुक्यातील हे लक्ष्मी नृसिंह मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. २७ एप्रिलपासून या मंदिरात जयंती महोत्सव सुरू आहे. ३० एप्रिलपासून ६ मेपर्यंत विविध कार्यक्रम या ठिकाणी झाले आहेत. दैनंदिन पूजा-अर्चा, भजन-कीर्तन अभिषेक, महापूजा, नैवैद्य, आरती, महापुष्प असे उपक्रम झाले. ६ मे रोजी झालेल्या लळिताच्या कीर्तन साेहळ्यात इतिहासातील हिरण्यकश्यपू आणि इतरांचे दाखले देत घाग महाराजांनी दाभोळकर आणि कोकाटे यांचा उल्लेख करत ते विष्णूंच्या विरोधात जात असतील तर त्यांना फाडायचेच असते, असे जाहीर वक्तव्य करत समाजात विद्वेष निर्माण करण्याची कृती केल्याने खळबळ उडाली. 

पुरोगामी कार्यकर्त्यांमधून संताप 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतरही अपशब्द वापरले गेले. तसेच इतिहास संशोधक, शिव व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांना जीवे मारून फाडून टाकण्याची धमकी या मंदिरासारख्या पवित्र तीर्थावरून दिली गेल्याने पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Ravana, Kansa, Mahishasur, Dabholkar, Kokate are meant to be torn apart; Controversial statement of Sharadbuwa Ghag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली