रवींद्र माने खुनातील तिघांना अटक
By admin | Published: May 3, 2017 12:04 AM2017-05-03T00:04:45+5:302017-05-03T00:04:45+5:30
रवींद्र माने खुनातील तिघांना अटक
सांगली : येथील अहिल्यानगरमधील तडीपार गुंड रवींद्र माने याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित बाबू शिंदेसह तीन संशयितांना अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. रवींद्र शहरात आल्याची बाबूने पोलिसांना ‘टीप’ दिली होती. यातून या दोघांत वाद होऊन त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यामुळे रवींद्रची ‘गेम’ केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. याप्रकरणी रवींद्रचा मित्र इमाम मेहबूब शेख (वय १९, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्यांमध्ये बाबू ऊर्फ मल्हारी बबन शिंदे (वय २३, रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर), ऋषिकेश दिनकर गळवे (१९, वाल्मिकी आवास) व नागेश सुधीर हडदरे (२२, संभाजीनगर, जुना बुधगाव रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांना न्यायालयाने ५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. खून झाल्यापासून ते फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सहा महिन्यांपूर्वी रवींद्रला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. २८ मार्चला तडीपार आदेशचा भंग करुन रवींद्र सांगलीत आला होता. त्याला गुंडाविरोधी पथकाने पकडले होते. पथकाला मी आल्याची ‘टीप’ बाबू शिंदे याने दिल्याचा संशय रवींद्रला आला होता.
याचा त्याने बाबूला जाबही विचारला होता. यातून दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. गेली एक महिना त्यांच्यात धुसफूस सुरु होती.
गेल्या आठवड्यात बाबूने रवींद्रच्या गटातील एका तरुणास बोलावून घेतले. त्याला कवलापूर (ता. मिरज) येथील माळावर नेऊन बेदम मारहाण केली होती. ही बाब बाबूला समजताच घटनेपूर्वी एक दिवस अगोदर रवींद्र बाबूच्या घरी गेला होता. त्याने बाबूला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे दोघांतील वैरत्व वाढले. बाबूनेही रवींद्रला सोडायचे नाही, अशी शपथच घेतली. त्याने हत्यारांची जुळवा-जुळव करुन दुसऱ्या दिवसापासून त्याने रवींद्रवर पाळत ठेवली. घटनेदिवशी रवींद्र भावाच्या वाढदिवसासाठी कलानगर येथे मंडप ठरवून तो तीन मित्रांसोबत निघाला असता बाबूने त्याची ‘गेम’ केली होती. (प्रतिनिधी)
माफी मागायला लावून केला हल्ला
रवींद्र भावाच्या वाढदिवसासाठी मंडप ठरवून तो घेऊन जात असताना बाबू व त्याच्या साथीदारांनी त्याला कलानगरमधील दत्त मंदिराजवळ गाठले. रवींद्रच्या दुचाकीला मोटारीने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रवींद्र व त्याचा मित्र भोराप्पा आमटे उडून पडताच बाबू व साथीदार हत्यारे घेऊन उतरले. त्यांनी रवींद्रला ‘टार्गेट’ केले. बाबूने गेली एक महिनाभर सुरु असलेला वाद उकरुन काढून रवींद्रला पाय धरुन माफी मागायला सांगितले. रवींद्रनेही घाबरुन खाली वाकून गुडगे जमिनीववर टेकून बाबूच्या डोक्यावर पाय ठेवून माफी मागत होता. तेवढ्यात बाबू व साथीदारांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने घाव घातले. रवींद्रला त्यांनी बचावाची संधी दिली नाही, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांना रवींद्रचा गुडघे टेकलेल्या स्थितीतच मृतदेच आढळून आला होता.