Sangli: एमडी ड्रग्जसाठी वापरलेला कच्चा माल जप्त, तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:44 IST2025-02-08T15:44:36+5:302025-02-08T15:44:52+5:30

सांगली : कार्वे (ता. खानापूर) येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा खोलवर तपास सुरू आहे. संशयितांनी वापरलेला कच्चा माल जप्त केला ...

Raw material used for MD drugs seized in Sangli, police custody of three extended | Sangli: एमडी ड्रग्जसाठी वापरलेला कच्चा माल जप्त, तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

Sangli: एमडी ड्रग्जसाठी वापरलेला कच्चा माल जप्त, तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

सांगली : कार्वे (ता. खानापूर) येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा खोलवर तपास सुरू आहे. संशयितांनी वापरलेला कच्चा माल जप्त केला आहे. हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात कोठून आणला याची चौकशी सुरू आहे. ऑनलाइन साहित्य मागवल्याचेही स्पष्ट झाले आहे. याचा तपास सुरू असून आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या जितेंद्र परमार, अब्दुल रजाक शेख, सरदार पाटील या तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

एमडी ड्रग्जच्या तपासाबाबत अधीक्षक घुगे म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात सहा जणांसह कारखान्यास जागा देणाऱ्या महिलेस अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. तपासात कोणाचा हस्तक्षेप चालू देणार नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून व्यवस्थित तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.

एमडी ड्रग्जसाठी आरोपींनी कच्चा माल मोठ्या प्रमाणात आणला होता. तो कोठून आणण्यात आला, याची चौकशी सुरू आहे, तसेच काही ऑनलाइन साहित्यही मागवले होते. या सर्वांचा तपास सुरू आहे. एमडी ड्रग्ज बनवताना पहिल्या बॅचमध्ये अपयश आले होते. संशयितांनी कच्चा माल आणि पहिल्या प्रयत्नात बनवलेले एमडी ड्रग्ज नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हा माल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील या तिघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना विटा येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा त्यांची कसून चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी वाढवून मागितली. त्यानुसार न्यायाधीशांनी तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी वाढवली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे तपास करत आहेत.

पाच किलो माल जप्त

संशयितांनी एमडी ड्रग्जची पहिली बॅच व्यवस्थित न निघाल्यामुळे त्यासाठीचे वापरलेले केमिकल व कच्चा माल औद्योगिक वसाहतीपासून काही अंतरावर टाकून दिला होता. पोलिस तपासात याची माहिती मिळाल्यानंतर जवळपास पाच किलो माल जप्त करण्यात आला आहे.

तपासाकडे लक्ष

एमडी ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत महिलेसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. संशयित तिघांची पोलिस कोठडी वाढवल्यामुळे तपासात त्यांच्याकडून आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. आणखी काही जणांना अटक केली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासाकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Raw material used for MD drugs seized in Sangli, police custody of three extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.