Sangli: मांजर्डेत एमडी ड्रग्जचा ११.३७ लाखांचा कच्चा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 11:58 AM2024-04-01T11:58:44+5:302024-04-01T11:58:44+5:30

गुन्हे अन्वेषणसह तासगाव पोलिसांची संशयिताच्या घरावर छापा टाकून कारवाई

Raw material worth 11.37 lakhs of MD drugs seized in Manjarde Sangli | Sangli: मांजर्डेत एमडी ड्रग्जचा ११.३७ लाखांचा कच्चा माल जप्त

Sangli: मांजर्डेत एमडी ड्रग्जचा ११.३७ लाखांचा कच्चा माल जप्त

मांजर्डे : मांजर्डे (ता. तासगाव) येथील दत्तनगर परिसरातील रस्त्यालगत असलेले पत्र्याच्या शेडमध्ये एमडी ड्रग्ज बनविणयासाठी लागणारा ११ लाख ३७ हजार रुपये किमतीचा कच्चा माल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि तासगाव पोलिसांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली.

इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे बनवण्यात येणाऱ्या एमडी ड्रग्जसाठी मांजर्डेतून कच्चा माल पुरवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई पोलिसांनी प्रसाद बाळासाहेब मोहिते (रा. मांजर्डे) याला अटक केली होती. रविवारी त्याच्याच घरातून कच्चा माल जप्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि तासगाव पोलिस यांना इरळी येथे जप्त केलेल्या एमडी ड्रग्जचे मांजर्डेत कनेक्शन असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवारी सकाळी मांजर्डे येथील दत्तनगर परिसरात संशयित प्रसाद मोहिते याचे वडील बाळासाहेब रंगराव मोहिते यांच्या गट नंबर ३५६/ब रानात असलेल्या घरावर छापा टाकला.

घराच्या मागे असलेल्या शेडमध्ये पोलिसांना क्लोरोफॉर्म व ॲसिड असलेले बॅरेल मिळून आले. क्लोरोफॉर्मचे १५ बॅरेल व ॲसिडचे १२ कॅन सापडले. एकूण ११ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एमडी ड्रग्ज बनविण्यासाठीचा हा कच्चा माल मांजर्डे येथून इरळी येथील कारखान्यात पाठविला जात होता. इरळी येथे एमडी ड्रग बनविल्यानंतर ते राज्यात इतरत्र पाठवले जात होते, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, तासगावचे निरीक्षक सोमनाथ वाघ, सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर टिंगरे, सहायक फौजदार मुलाणी, बिरोबा नरळे, अमोल ऐदाळे, बाबासाहेब मदने, दरिबा बंडगर, अविनाश घोरपडे, नायब तहसीलदार धनश्री स्वामी, ड्रग्ज निरीक्षक राहुल कारंडे, प्रा. अनिल पोवार, संदीप गुरव, प्रदीप पाटील, लहू जाधव आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.

मुंबई पोलिसांना चकवले

मुंबई पोलिसांनी यापूर्वीच एमडी ड्रग्ज प्रकरणात मांजर्डे येथील प्रसाद मोहिते याला अटक केली आहे. त्याच्या घराजवळील शेडमध्ये कच्चा माल बनवून तो इरळीला पाठवला जात होता. मुंबई पोलिसांना हे कनेक्शन प्रसादला अटक करूनही लक्षात आले नाही. त्यांनी केवळ इरळीत कारवाई केली. मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर सांगली पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली होती. अखेर सांगली पोलिसांनी बाजी मारत मुंबई पोलिसांना धक्का देत पर्दाफाश केला. पोलिसांनी घरावर गुप्त पाळत ठेवत हे प्रकरण उघड केले आहे.

संशयित नातेवाईक

प्रसाद मोहितेला मुंबई पोलिसांनी पकडल्यानंतर इरळीत छापा मारला. त्यानंतर इरळीतील मुख्य सूत्रधार प्रवीण शिंदे (रा. बलगवडे) याला अटक केली. प्रसाद मोहिते हा प्रवीण शिंदे याचा मेहुणा आहे.

द्राक्षबागेचे औषध सांगितले

मुंबई पोलिसांच्या ताब्यातील प्रसाद मोहितेच्या घराजवळील शेडवर छापा मारुन त्याच्या वडिलांकडे पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा प्रसादने त्यांना द्राक्षबागेसाठीच्या औषधाचा साठा शेडमध्ये ठेवल्याचे त्यांना सांगितले , अशी माहिती मिळाली.

Web Title: Raw material worth 11.37 lakhs of MD drugs seized in Manjarde Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.