वेगळीच 'केस'! आठ तोळे सोन्याचा बनवला वस्तरा; सांगलीतील सलूनचा नादच खुळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 11:13 AM2024-03-18T11:13:29+5:302024-03-18T11:14:06+5:30
रिळेमध्ये अनोखे सलून : ग्राहकांत उत्सुकता सुवर्णस्पर्शाची, दागिने घेण्याचा बेत बदलून पाच लाख रुपये गुंतविले ग्राहकांच्या सेवेत
विकास शहा, लोकमत न्यूज नेटवर्क, शिराळा: रिळे (ता. शिराळा ) या ग्रामीण भागातील नाभिक समाजातील अशोक शंकर देसाई यांचे वडीलोपार्जित केसकर्तनालया' चे दुकान गेली अनेक दशके सुरू आहे. यांची दोन मुले अमोल व प्रदीप यांनी वातानुकूलित दुकान केले आणि चक्क जवळपास आठ तोळे वजनाचा वस्तारा केला असून त्याद्वारे फक्त शंभर रुपयात दाढी व केस कापत आहेत.
वडिलांनी सर्व आयुष्य या व्यवसायासाठी त्यांनी समर्पित केले आहे. सध्या ते वृद्धत्वाकडे झुकलेत. कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच ! अशोक देसाई यांनी पत्नीच्या समर्थ साथ व थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप ! ही दोन मुलेही नाभिक व्यवसायाकडे वळले .
जेमतेम शिक्षण असणारा थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप गेल्या पंधरा-वीस वर्षापासून नाभिक व्यवसायात कार्यरत आहेत. प्रामाणिक व्यवसाय आणि तत्पर सेवा यामुळे तालुक्यातील ग्राहकांचा या दुकानात सातत्याने राबता आहे. माफक दरामध्ये सेवा देण्यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे. या व्यवसाया बरोबर सामाजिक कामामध्ये ही सहभाग असतो. गेल्या काहि वर्षापूर्वी व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून एखादा सोन्याचा दागिना बनवायचा मानस या दोघा भावांनी आई-वडिलांना बोलून दाखविला होता. आई-वडीलांनीही त्यास मान्यता दिली होती. दोघा भावांनी व्यवसाय करता करता बचत करून मिळणाऱ्या पैशातून एक बचत संचयनी सुरू केली. दहा पंधरा वर्षाच्या व्यवसायातून बचतीचे काम सातत्याने सुरूच होते.
दोघा भावांची ही व्यवसायावर प्रचंड श्रद्धा ! साठवलेल्या पैशातून कुटुंबासाठी दाग दागिने ते सहज करू शकले असते. परंतु तसे करण्याचा मोह त्यांना झाला नाही.दोघा भावांनी प्रचंड चिकाटी आणि कष्टातून साठवलेले जवळपास सहा लाख रुपये साठवले घरातील जुने सोने यातून त्यांनी व्यवसायासाठी नवी शक्कल लढवली.
व्यवसायातील श्रद्धेपोटी त्यांनी चक्क आठ तोळ्याचा जवळपास साडेपाच लाखाचा 'दाढी करण्याचा सोन्याचा वस्तारा' बनविला त्यास पन्नास हजार रुपयांच्या दरम्यान मजुरी लागली.हा वस्तारा शिराळा येथील गौरव पारेख यांच्या सराफ दुकानात बनवला.तो बनविण्यासाठी जवळपास दोन -अडीच महिन्यांचा कालावधी लागला.मुंबई व कोल्हापूर येथील कारागिरांचे सहकार्य मिळाले.
हा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी करण्यासाठी परिसरातील लोकांची दुकानात रीघ लागली आहे. अनेक ग्राहक वेटिंगमध्ये आहेत. सोन्यासारख्या ग्राहकांची सेवा सोन्याच्या वस्ताऱ्याने करण्याचे ब्रीद घेऊन हे बंधू काम करत आहेत. प्रदीप यानेही शिराळा येथे आपला व्यवसाय सुरू केला आहे.
"भारतीयांना आजही सोन्याचे आकर्षण कायम आहे. हौस, प्रतिष्ठा म्हणून सोने खरेदी करणारे अनेक आहेत. अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याला गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्व आलेय. चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून 'सोन्याकडे' पाहिले जातेय. मात्र त्याचे दर सामन्यांना परवडणारे नाहीत. सामान्यांना दुकानात 'सोन्या' च्या वस्ता-याने केस, दाढी केल्याने त्यांनाही समाधान आणि प्रसन्न वाटेल. " - अशोक देसाई, रिळे.
"कोणताही वडीलोपार्जित अथवा स्वतः निवडलेला व्यवसाय श्रेष्ठ किवा कमीपणाचा नसतो. मात्र तो निर्व्यसनी राहुन, त्यात झोकून देऊन प्रामाणिकपणे केला पाहिजे. यशप्राप्ती होते. समाधानी राहता, जगता येते." - अमोल आणि प्रदीप देसाई, रिळे.