सांगली जिल्ह्यात गव्याची पुन्हा एन्ट्री; ठाणापुडे, चिकुर्डे परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 03:49 PM2022-01-03T15:49:35+5:302022-01-03T15:52:57+5:30
वारणा नदीकाठच्या परिसरात तीन पूर्ण वाढ झालेल्या गव्यांचा कळप दिसून आला. यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
इस्लामपूर : मागील आठवड्यापुर्वी सांगली शहरात घुसलेल्या गव्याला पकडून वनविभागाने अखेर नैसर्गिक अधिवासात सोडले. यानंतर आज वाळवा तालुक्यातील ठाणापुडे आणि चिकुर्डे गावातील वारणा नदीकाठच्या परिसरात तीन पूर्ण वाढ झालेल्या गव्यांचा कळप दिसून आला. यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून दुपारपर्यंत हे अधिकारी फिरकले नव्हते.
चिकुर्डे परिसरातील ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणापुडेच्या बाजूने हा गव्यांचा कळप चिकुर्डे हद्दीत आला आहे. गावचे पोलिस पाटील, उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व इतर ग्रामस्थांनी या गव्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. गव्यांच्या पायाचे ठसे दिसले आहेत. मात्र हा कळप पुढे कुठे गेला, हे सांगता येत नसल्याचे पोलिस पाटील यांनी सांगितले.
पहाटे हा गव्यांचा कळप ठाणापुडे परिसरात होता. तो सकाळी नदीकाठाने पाणंद रस्त्यावरून जॅकवेलपासून चिकुर्डे हद्दीतील नदीकाठाच्या परिसरात असण्याची शक्यता आहे. विठोबा मंदिरामागे असणाऱ्या शिंद वस्तीपासून थोड्या अंतरावर वारणा नदीच्या काठी हा कळप असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या परिसरातील उसामध्येच त्यांचे वास्तव्य असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.