सह्याद्रीनगर रस्त्यावरून पुन्हा वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:11 PM2018-11-13T23:11:23+5:302018-11-13T23:11:27+5:30
सांगली : येथील सह्याद्रीनगरमधील शंभर फुटी रस्त्याच्या डांबरीकरणावरून मंगळवारी पुन्हा वादावादीचा प्रकार घडला. नगरसेवक संतोष पाटील व काही स्थानिक ...
सांगली : येथील सह्याद्रीनगरमधील शंभर फुटी रस्त्याच्या डांबरीकरणावरून मंगळवारी पुन्हा वादावादीचा प्रकार घडला. नगरसेवक संतोष पाटील व काही स्थानिक नागरिकांनी बंद पडलेले रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे स्त्याच्या मूळ जागेवर दावा करणाऱ्या ४२ नागरिकांनी त्यांना थांबविले. दोन्ही गटात जोरदार वादावादी व धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
रस्त्याच्या मालकीवरून हा वाद उफाळलेला असताना, उपायुक्तांनी १७ नोव्हेंबरपर्यंत रस्त्याचे कामच थांबवण्याचे आदेश दिले. या प्रभागाचे नगरसेवक संतोष पाटील यांनी महापौर, सभापती यांनी प्रशासनावर दबाव आणून भाजपच्याच आमदारांनी उद्घाटन केलेल्या रस्त्याचे काम बंद पाडले, असा आरोप केला आहे.
सांगलीच्या सह्याद्रीनगरमधील महापालिकेने सुरू केलेल्या शंभर फुटी रस्त्याचे काम येथील ४२ कुटुंबांनी बंद पाडले. जागेवर दावा करीत या कुटुंबांनी रस्त्याकडेला पुन्हा घरे उभारली. न्यायालयीन कागदपत्रे, जागेच्या कागदपत्रांवरून त्यांनी आपला दावा मांडला आहे. महापालिकाच बेकायदेशीरपणे काम करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे महापालिकेने व कॉँग्रेस नगरसेवक संतोष पाटील यांनी रस्त्याचे काम कायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या रस्त्याच्या मालकीवरून हा वाद उफाळला आहे. मंगळवारी रस्त्यावर दावा करणारे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांत धक्काबुक्कीही झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी दोन्ही गटाला हुसकावून लावले.
यावेळी ही जागा आमची असल्याने यावर रस्ता होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत ४२ कुटुंबांनी हे रस्त्याचे काम बंद पाडले; मात्र स्थानिक नागरिकांनी पुन्हा हे काम सुरू केले. स्वत: नगरसेवक संतोष पाटील आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर खडी पसरण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आले. त्यामुळे वादावादीसह धक्काबुक्की झाली. यावेळी संजयनगर पोलिसांनी तातडीने धाव घेत दोन्ही गटाला शांत केले; मात्र पोलिसांसमोरसुद्धा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यानंतर अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला आहे. दरम्यान, दुपारपर्यंत या या परिसरात वातावरण तणावाचे होते.
यादरम्यान इलाही बारुदवाले यांच्या तक्रारीनंतर महापालिकेत तातडीची बैठक झाली. या बैठकीत १७ नोव्हेंबर रोजी याबाबत बैठक बोलावण्यात आली असून, तोपर्यंत या रस्त्याचे काम बंद ठेवण्याचे तसेच या रस्त्यावर कोणीही अतिक्रमण करू नये, याबाबतचे आदेश उपायुक्त स्मृती पाटील यांनी शहर अभियंत्यांना दिले. त्यामुळे दुपारनंतर या रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे.