समाजातील ‘विश्वास’ उभारतोय मानवतेची खरीखुरी भिंत

By Admin | Published: November 3, 2016 11:39 PM2016-11-03T23:39:37+5:302016-11-03T23:39:37+5:30

आदर्शवत उपक्रम : दिवाळीचे पैसे, स्पर्धेतून मिळालेल्या रकमेतून कोकरुडमधील महाविद्यालयीन युवकाने केली मदत

Real wall of humanity is building 'faith' in society | समाजातील ‘विश्वास’ उभारतोय मानवतेची खरीखुरी भिंत

समाजातील ‘विश्वास’ उभारतोय मानवतेची खरीखुरी भिंत

googlenewsNext

 
बाबासाहेब परीट ल्ल बिळाशी
कोकरुड (ता. शिराळा) येथील महाविद्यालयीन युवकाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमधून मिळालेले पैसे आणि दिवाळीसाठी वडिलांनी दिलेल्या पैशातून, ऐन दिवाळीत दारात शिळे-पाके तुकडे मागायला आलेल्या गोपाळ समाजाच्या आणि नंदीवाल्यांच्या पालावर जाऊन त्यांच्या २0 मुलांना नवीन कपडे व दिवाळीचा फराळ दिला. यातून त्याने खरीखुरी माणुसकीची भिंत उभी करण्याचा आगळावेगळा प्रयत्न केला. या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे विश्वास घोडे.
समाजात धर्म, वंश, पंथ, पैसा, प्रतिष्ठा आणि जातीपातीच्या भिंती माणसा-माणसात उभ्या करून, गावात गाव आणि भावात भाव न राखण्याचे षड्यंत्र रचून, संपूर्ण समाजव्यवस्था खिळखिळी करण्याचा आजचा काळ. एकीकडे मोठ्या आवाजाचे फटाके फोडून, बँ्रडेड कपड्यांच्या स्पर्धा करून दिवाळी साजरी होत असताना, ‘माई, शिळंपाकं द्या.., फराळाचं गोड नको, शिळी भाकर द्या...’ असं म्हणत दुसऱ्याच्या दारात जाऊन दाताच्या कण्या करणारी चिमुकली लेकरे पाहून विश्वास घोडे या युवकाच्या मनात माणुसकीचा पाझर फुटला. हा युवक कमावता नाही. पण दातृत्वाला मोठे मन असावे लागते, धन नसले तरी चालते. त्याप्रमाणे त्याने वडिलांनी कपड्यांसाठी दिलेले तीन हजार रुपये, तसेच भाषणातून मिळालेल्या काही पैशातून गरीब मुलांना कपडे देण्याचा निर्णय घेतला. ही कल्पना त्याने त्याच्या मराठी शाळेतल्या गुरुजींना सांगितली. त्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले व त्यांच्यावतीने आणखी पाच कपड्यांचे जोड दिले. त्यानंतर विश्वासने भाऊबीजेदिवशी कोकरुड फाट्याशेजारी असणाऱ्या पालांवर जाऊन तेथील २0 मुलांना शालेय गणवेश दिले व त्यांनाही नव्या कपड्यांचा आनंद मिळवून दिला.
स्पर्धा परीक्षांच्या नादी लागून अद्याप हाताला काहीही न लागल्याने बेजार झालेल्या, पण उमेद न हरलेल्या, स्वत:च्या पायावर उभे न राहता इतरांना उभे करण्यासाठी धडपडणाऱ्या या युवकाचा हा ‘विश्वास’ पाहून साऱ्या गावाला अभिमान वाटत आहे. आपल्याला असलेले मोजके कपडे पुरेसे आहेत, गरजेपेक्षा जास्त वापरणे म्हणजे गरजवंतांना ओरबाडणेच, हे त्याचे मत. शाळेत असताना त्याच्या गुरुजींनी ‘एक लाडू गरिबांसाठी’ हा संकल्प सोडला होता. त्यांचाच वारसा तो पुढे चालवत आहे. त्याचा हा उपक्रम धनवानांना अचंबित करणारा आहे.
एकीकडे ‘जुने नको असलेले देऊन जा आणि ज्यांना हवे आहे, त्यांनी घेऊन जा’, या संकल्पनेवरील माणुसकीची भिंत सोशल मीडियावर चर्चेत आली असताना, एका महाविद्यालयीन युवकाने कोणताच डामडौल आणि दिखावा न करता माणुसकीचा सेतू यथाशक्ती उभा करून आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या सद्सद्विवेकबुध्दीला सलाम करायलाच हवा!
 

Web Title: Real wall of humanity is building 'faith' in society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.