धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे महसूलमंत्र्यांचे आश्वासन
By admin | Published: September 19, 2016 11:39 PM2016-09-19T23:39:50+5:302016-09-20T00:04:33+5:30
गौरव नायकवडी : जागा देण्याबाबत प्रशासनाला सूचना
वाळवा : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनाचा व जमिनी प्राप्त होण्याचा लढा ३२ वर्षे सुरू आहे. याबाबत अंमलबजावणी व्हावी, यासाठी महसूल व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुंबई येथे शनिवारी बैठक झाली.
यावेळी वाळव्याचे सरपंच व वारणा धरणग्रस्त संग्राम संघटनेचे प्रमुख गौरव नायकवडी, खा. राजू शेट्टी, नजीर वलांडकर, भारत पाटील, मुसा मुल्ला, श्रीपती पाटील, संपत बेलवलकर प्रमुख उपस्थित होते.
पाटील यांना धरणग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनाबाबतच्या ३२ वर्षांच्या लढ्याची माहिती गौरव नायकवडी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, धरणग्रस्तांनी अनेकवेळा मोर्चे काढले, कुटुंबियांसमवेत तुरुंगवास भोगला. आज अनेक धरणग्रस्त कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर आंदोलनाचे खटले सुरू आहेत. त्यामुळे त्यांना न्यायाबाबत हेलपाटे मारावे लागत आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वेचले; परंतु जिल्हाधिकारी, आयुक्त तसेच मंत्रालयापर्यंत घेतलेल्या बैठकीत निर्णय होऊनसुद्धा शासन पातळीवरील उदासीनता आहे.
ज्यांना भूखंड मिळालेले नाहीत, त्यांची यादी तयार करणे व ज्यांना जमिनी मिळालेल्या नाहीत,अशांना एक महिन्याच्या आत पूर्तता करावी अशा सूचना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (वार्ताहर)
जमिनी तात्काळ देणार
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लागणारी जमीन संपादनासाठी सांगली जिल्ह्यामध्ये २०२ हेक्टर जमिनीसाठी प्रस्ताव चालू आहे. त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध असल्याचे पाटील यांनी सांगितले.