मागासवर्गीय समितीत उपमहापौर गटाची बंडखोरी
By admin | Published: June 21, 2016 10:51 PM2016-06-21T22:51:16+5:302016-06-22T00:09:42+5:30
महापालिका : सभापती निवडणुकीत चुरस वाढली, सत्ताधारी काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजीला उधाण
सांगली : महापालिकेच्या मागासवर्गीय समिती सभापतिपदासाठी मंगळवारी उपमहापौर गटाकडून सुरेखा कांबळे यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. काँग्रेसने शेवंता वाघमारे यांना, तर राष्ट्रवादीने विद्यमान सभापती स्नेहल सावंत यांना पुन्हा रिंंगणात उतरवले आहे. सभापतिपदासाठी तीन अर्ज दाखल झाल्याने निवडीत चुरस वाढली आहे. संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेसमधील दोन्ही गटांनी कंबर कसली असून, राष्ट्रवादीनेही पुन्हा सभापतीपद पदरात पाडून घेण्याची व्यूहरचना आखली आहे. बंडखोरीमुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
मागासवर्गीय समिती सभापतीची बुधवारी निवड होत आहे. या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अंतिम मुदत होती. या मुदतीत शेवंता वाघमारे, सुरेखा कांबळे, स्नेहल सावंत या तिघांनी अर्ज दाखल केले. सभापतिपदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सकाळपासूनच खल रंगला होता. गटनेते किशोर जामदार यांच्या कार्यालयात मदनभाऊ पाटील गट थांबून होता, तर उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने यांचा गट त्यांच्या कार्यालयात होता. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमधील उमेदवार ठरत नव्हता.
दुपारी दोनच्या सुमारास गटनेते जामदार यांनी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व पतंगराव कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर शेवंता वाघमारे यांचा अर्ज भरण्यात आला. या अर्जावर बसवेश्वर सातपुते, कांचन कांबळे व विवेक कांबळे यांनी सूचक व अनुमोदक म्हणून सह्या केल्या. यावेळी महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील उपस्थित होते. दुसरीकडे उपमहापौर गटानेही अर्ज दाखल करण्याची तयारी ठेवली होती. या गटाकडून सुरुवातीला स्वाभिमानी आघाडीचे बाळासाहेब गोंधळी यांना रिंगणात उतरविले जाणार होते. गोंधळी यांनी अर्जही नेला होता. पण मंगळवार सकाळपासून ते गायब होते. त्यांचा भ्रमणध्वनी लागत नव्हता. गोंधळी न आल्याने शेवटच्या क्षणी सुरेखा कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत त्यांचा अर्ज भरण्यात आला. यावेळी उपमहापौर घाडगे, नगरसेवक शेखर माने, गजानन मगदूम, अनिलभाऊ कुलकर्णी, अश्विनी कांबळे उपस्थित होते. उपमहापौर गटाच्या बंडखोरीने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
राष्ट्रवादीने विद्यमान सभापती स्नेहल सावंत यांनाच पुन्हा संधी दिली आहे. काँग्रेसमधील संघर्षाचा सलग दुसऱ्यावर्षी फायदा उचलण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. ही गटबाजी कितपत टिकते, त्यावर सावंत यांचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)
विवेक कांबळेंचा त्रागा
मागासवर्गीय समितीचे सदस्य तथा माजी महापौर विवेक कांबळे हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. गतवर्षी सभापती निवडीवेळी मदन पाटील यांनी बाळासाहेब गोंधळी यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा गोंधळींचा पराभव झाला होता. मदनभाऊंचा अपमान करणाऱ्यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे. मदनभाऊ आजारी असताना त्यांना सदस्यांनी त्रास दिला. आता तेच सदस्य रिंगणात उतरले आहेत. या उमेदवाराला आपण मतदान करणार नाही. प्रसंगी विरोधी उमेदवाराला मतदान करू, असे कांबळे यांनी जाहीर केले आहे.
समितीतील संख्याबळाचे त्रांगडे
मागासवर्गीय समितीत ११ सदस्य आहेत. त्यापैकी काँग्रेसचे सहा व राष्ट्रवादीचे चार व स्वाभिमानीचा एक असे संख्याबळ होते. पण गेल्या वर्षभरात बरीच समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यात मदनभाऊ गटाकडे चार, उपमहापौर गटाकडे चार, तर राष्ट्रवादीकडे तीन सदस्य आहेत. काँग्रेसमधील बसवेश्वर सातपुते हे उपमहापौर गटाचे मानले जातात, पण आज त्यांनी शेवंता वाघमारे यांच्यासाठी सूचक म्हणून सही केली आहे. तर राष्ट्रवादीच्या शुभांगी देवमाने यांनी उपमहापौर गटाला साथ दिली आहे. त्यामुळे कोणत्या गटाचे किती संख्याबळ याविषयी संभ्रम निर्माण आहे.
कोण काय म्हणाले?
काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व पतंगराव कदम यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून शेवंता वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडीतही नेहमीप्रमाणे बंडखोरी झाली आहे. सर्व नेतेमंडळी चर्चा करून बंडखोर उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास लावतील. आम्हीही तशी विनंती करू. या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल.
- हारुण शिकलगार, महापौर
काँग्रेसच्या नेत्यांनी अधिकृत उमेदवाराबाबत कसलीही घोषणा केलेली नाही. त्याबाबत गटनेते किशोर जामदार यांनीही नगरसेवकांना कल्पना दिलेली नाही. त्यामुळेच ही बंडखोरी नाही. सुरेखा कांबळे यांचा काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे माघारीबाबत उमेदवारच निर्णय घेतील. काँग्रेसचे संख्याबळ असल्याने विजय निश्चित आहे.
- शेखर माने, उपमहापौर गट