सुमनतार्इंकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2015 11:11 PM2015-06-17T23:11:31+5:302015-06-18T00:40:55+5:30

कवठेमहांकाळमध्ये आढावा बैठक : प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही

Recall of officers from Sumantrai | सुमनतार्इंकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

सुमनतार्इंकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

Next

कवठेमहांकाळ : आमदार सुमनताई पाटील यांनी कवठेमहांकाळ येथे घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. कामात कुचराई करणाऱ्या शिक्षण आणि छोटे पाटबंधारे विभागाच्या प्रमुखांना धारेवर धरले. येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार सुमनताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ही आढावा बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरुवातीला करेवाडीच्या सरपंचांनी पिण्यासही पाणी मिळत नसल्याचा कळीचा मुद्दा उपस्थित केला. यावर तांत्रिक अडचणी सांगून सारवासारव करणारी उत्तरे देणाऱ्या उपअभियंता अरविंद चव्हाण यांची सर्वांनीच कानउघाडणी केली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के यांनी गट शिक्षणाधिकारी आर. जी. पाटील यांना चांगलेच धारेवर धरले. दुधेभावी येथील दगडू हजारे हे शिक्षक गेल्या वर्षभरापासून सातत्याने गैरहजर राहत आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा जाब हाक्के यांनी विचारला. आमदार सुमनताई पाटील आणि सभापती वैशाली पाटील यांनी हजारे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवा, असे आदेश दिले.
कवठेमहांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रुग्णांना मिरज, सांगलीकडे पाठविले जाते, हा मुद्दाही चांगलाच गाजला. याबाबत योग्य ती कारवाई करा, अशी विनंती आमदार सुमनताई यांनी आरोग्य व बांधकाम सभापती गजानन कोठावळे यांनी केली.
सभापती वैशाली पाटील यांनी स्वागत केले. या आढावा बैठकीला सुरेश पाटील, नामदेव करगणे, दत्ताजीराव पाटील, भाऊसाहेब पाटील, योजनाताई शिंदे, उपसभापती जगन्नाथ कोळेकर, पतंग यमगर, कल्पना पाटील, गणपती सगरे, टी. व्ही. पाटील, हायूम सावनूरकर, दादासाहेब कोळेकर, अनिल शिंदे, आप्पासाहेब पाटील, जालिंदर देसाई, एम. के. पाटील, विठ्ठल कोळेकर, रजनीकांत पाटील, बाबासाहेब पाटील, दिलीप ओलेकर, सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Recall of officers from Sumantrai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.