महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर सूचनांचा पाऊस : सांगली महासभेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:17 AM2019-01-05T01:17:19+5:302019-01-05T01:17:33+5:30
सांगली : महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर शुक्रवारी विशेष महासभेत नगरसेवकांनी सूचनांचा पाऊस पाडला. पेट्रोल, डिझेलसह विद्युत खांबांवरही कर आकारण्याची मागणी नगरसेवकांनी ...
सांगली : महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर शुक्रवारी विशेष महासभेत नगरसेवकांनी सूचनांचा पाऊस पाडला. पेट्रोल, डिझेलसह विद्युत खांबांवरही कर आकारण्याची मागणी नगरसेवकांनी केली. याबाबत सर्व खातेप्रमुखांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर संगीता खोत यांनी सभेत दिले. १५ जानेवारीनंतर सर्व विभागाच्या मॅरेथॉन बैठका घेऊन दर सुधार समितीपुढे अहवाल देण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष महासभेत उत्पन्नवाढीबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी प्रस्ताव चर्चेला आला होता. यावेळी सर्वच सदस्यांनी प्रशासनाने आतापर्यंत उत्पन्नवाढीसाठी काय केले? सदस्यांनी सभागृहात उत्पन्नवाढीसाठी अनेक उपाययोजना सुचवूनही याची अंमलबजावणी केली जात नाही, याबद्दलही सदस्यांनी खंत व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले, उत्पन्नवाढीबाबत प्रशासनाला सर्व काही माहीत आहे. आधी प्रशासनाने बोलावे, व्यवहार आणि कायदा याची सांगड घालून प्रशासनानेच सांगावे की, उत्पन्न कसे वाढवता येईल. आम्ही लोकांना का अंगावर घ्यायचे? असा सवालही त्यांनी केला.
संतोष पाटील म्हणाले, जीएसटी भरणाऱ्या सर्व लोकांना कराखाली आणा, यामुळे महानगरपालिकेचे उत्पन्न निश्चित वाढेल. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ९४ प्रकारचे परवाने दिले जातात. व्यवसाय करणारे सर्व व्यावसायिक शोधून काढा, ज्यांच्याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचा परवाना नाही, असे सर्व व्यवसाय बेकायदेशीर ठरवून कारवाई करा. शहरात अनेक ठिकाणी मोकळे प्लॉट आहेत, ज्यावर बांधकामे झालेली नाहीत, अशा जागा शोधून त्यांच्याकडून कर वसूल करा, दुकानगाळे, मुव्हेबल गाळे, खोकी यांच्याकडून साडेपाच कोटीची थकबाकी आहे. त्यांचे करार संपले आहेत. त्यांना बोलावून करार करुन वाढीव कर लावले पाहिजेत, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी सभापती असताना महानगरपालिका मालमता विभागाचे स्वतंत्र बँकेत खाते काढल्यानंतर दोन कोटी ४४ लाख रुपये जमा झाले होते. दर तीन महिन्यातून एकदा आढावा घेऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सविता मदने म्हणाल्या, काही खासगी रुग्णालयांची नोंदच आरोग्य विभागाकडे आहे. सर्व रुग्णालये रेकॉर्डवर घ्या, यातून उत्पन्न वाढू शकते. स्वाती शिंदे यांनी, गाळे हस्तांतरण थांबवले आहे, ते सुरु केल्यास किमान एक कोटीचे उत्पन्न वाढू शकते, असे मत मांडले. शेखर इनामदार यांनी, उत्पन्न वाढीकडे वीस वर्षात प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही. उत्पन्न वाढीसाठी अनेक
उपाय आहेत. पर्यटनासाठी कसलीच तरतूद अंदाजपत्रकात नाही, असे सांगितले.
माजी उपमहापौर विजय घाडगे यांनी, संस्था चालली पाहिजे, यासाठी खातेप्रमुखांनी आतापर्यंत काय केले? असा सवाल केला. राजेंद्र कुंभार यांनी, गाळ्यांची मुदत संपली आहे, त्यांची दरवाढ करुन घ्या, डिजिटल बोर्ड लावायला एकाच कंपनीला ठेका का दिला जातो? स्पर्धा निर्माण होण्यासाठी जाहीर निविदा का मागवत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. योगेंद्र थोरात यांनी, वायफाय टॉवर उभारल्यास त्यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळेल, अशी सूचना मांडली.
नगरसेवकांच्या सूचना...
पेट्रोलवर लिटरमागे १० पैसे कर आकारावा
व्यापाºयांकडील थकीत एलबीटी वसूल करावा
अपार्टमेंटमध्ये सर्वांना पाणी कनेक्शन बंधनकारक करावे
रुग्णालये, मंगल कार्यालयामधील पाणी मीटर तपासा
खोकी हस्तांतरणाच्या प्रलंबित प्रस्तावांची निर्गती करावी
खासगी रुग्णालयांच्या फीमध्ये वाढ करा
वीज कंपनीच्या खांबांना भाडे आकारणी करा
महापालिकेच्या खुल्या जागेवर व्यापारी संकुल उभारावेत
घरपट्टीचा नव्याने सर्व्हे करावा