वसंतदादा कारखान्यासाठी विक्रमी ६७ अर्ज दाखल
By admin | Published: April 25, 2016 11:21 PM2016-04-25T23:21:10+5:302016-04-26T00:27:27+5:30
पंचवार्षिक निवडणूक : विशाल पाटील, डी. के. पाटील, बाळागोंडा पाटील यांचेही अर्ज
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता सोमवारी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष विशाल पाटीलसह सात संचालक तसेच सत्ताधारी गटाकडून इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दिवसभरात दहा गटातून ६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
कारखान्याच्या निवडणुकीत यंदा संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या, मंगळवारी २६ एप्रिल रोजी अंतिम मुदत आहे. त्यामुळे मंगळवारीही मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत. विशाल पाटील यांच्यासह कारखान्याचे उपाध्यक्ष डी. के. पाटील यांनीही अर्ज दाखल केले. सत्ताधारी गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या अनेक उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची सूचना विशाल पाटील यांनी दिली होती. त्यानुसार अशा इच्छुकांनीही अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक २१ उमेदवारी अर्ज सांगली उत्पादक गटातून दाखल झाले आहेत. त्यानंतर आष्टा आणि मिरज गटातून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. या तिन्ही गटात सर्वाधिक चुरस आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यापूर्वी पॅनेलचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी सत्ताधारी गटाचे नेते तसेच शेतकरी संघटना व अन्य नेत्यांकडून हिरवा कंदील दर्शविला जात आहे. दीपक शिंदे यांच्या गटातील काही उमेदवारांनीही अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे.
विशाल पाटील यांनी सांगली उत्पादक गटाबरोबरच संस्था गटातूनही प्रत्येकी चार अर्ज दाखल केले आहेत. डी. के. पाटील यांनी तासगाव उत्पादक गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ मेपर्यंत असल्याने पॅनेल तयार करणे, बिनविरोधसाठी प्रयत्न करणे अशा गोष्टींसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना अर्ज मागे घेण्याच्या कालावधितच अधिक गती मिळण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
सांगली, मिरज, आष्ट्यात गर्दी
सांगली, मिरज आणि आष्टा गटातून मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सांगली गटातून विशाल पाटील, प्रदीप मगदूम, प्रभाकर पाटील, महावीर नेमगोंडा पाटील, अतुल पाटील, कुमार पाटील, आदिनाथ मगदूम, बाळासाहेब पाटील, राजेश एडके, विक्रमसिंह पाटील, मुरलीधर कांबळे, पंडित पाटील, मिरज गटातून विजयकुमार जगताप, तानाजी पाटील, संभाजी मेंढे, जिन्नेश्वर पाटील, राजाराम चव्हाण, मिलिंद खाडिलकर, दौलतराव शिंदे, अभय कब्बुरे, शिवाजी हिंदुराव पाटील यांचे, तर आष्टा गटातून सुनील आवटी, अशोक चव्हाण, संदेश आडमुठे, संदीप आडमुठे, बापूसाहेब शिरगावकर, माणिक पाटील, रमेश ताटे, अण्णासाहेब पाटील, सुनील कोरे, रंगराव मोरे, बाबासाहेब आडमुठे, शीतल पाटील, राजेंद्र पाटील, सर्जेराव पाटील यांचा समावेश आहे.