जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक १३०९ जणांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:28 AM2021-04-24T04:28:00+5:302021-04-24T04:28:00+5:30
सांगली : जिल्ह्यात आजवरच्या सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद शुक्रवारी झाली. दिवसभरात १३०९ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर जिल्ह्यातील २८ जणांसह ...
सांगली : जिल्ह्यात आजवरच्या सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद शुक्रवारी झाली. दिवसभरात १३०९ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर जिल्ह्यातील २८ जणांसह परजिल्ह्यातील १० अशा ३८ जणांचा मृत्यू झाला. ५५० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्यावर्षी जिल्हा, परजिल्हा मिळून १२७४ जणांची सर्वाधिक नोंद झाली होती. शुक्रवारी ही संख्या पार करत १३०९ कोरोनाबाधित आढळून आले. आटपाडी तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून तेथे तब्बल १८९ बाधित आढळले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक सात जण खानापूर तालुक्यातील असून वाळवा ६, मिरज तालुका ४, महापालिका क्षेत्र, आटपाडी, तासगाव आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी दोन तर पलूस, कडेगाव आणि जत तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात १९० तर आटपाडी, कडेगाव, मिरज, शिराळा तालुक्यात शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
प्रशासनाच्यावतीने आरटीपीसीआर अंतर्गत २४०६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ७२६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर रॅपिड अँटिजनच्या २९५२ जणांच्या नमुन्यांची चाचणी केली त्यात ६४४ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १० हजार ५०९ वर पोहोचली आहे. त्यातील १५९५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात १४४३ जण ऑक्सिजनवर तर १५२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर ५८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ६६८६६
उपचार घेत असलेले १०५०९
कोरोनामुक्त झालेले ५४३१९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २०३८
शुक्रवारी दिवसभरात
सांगली ९५
मिरज ९५
आटपाडी १८९
मिरज तालुका १७६
कडेगाव १५४
वाळवा १३८
तासगाव ९१
कवठेमहांकाळ ८९
खानापूर ८०
पलूस ७५
शिराळा ७२
जत ५५
चौकट
लस संपली!
कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा संपल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर दुपारनंतर लसीकरण ठप्प झाले. महापालिकेच्या सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रांवर दुपारीच लस संपली. दिवसभरात ६५१७ जणांना लस देण्यात आली. शनिवारी संध्याकाळी लस येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (सविस्तर वृत्त : पान २ वर)