घरपट्टीची रेकॉर्ड ब्रेक वसुली
By admin | Published: October 6, 2016 11:53 PM2016-10-06T23:53:27+5:302016-10-07T00:05:29+5:30
महापालिका : एका दिवसात ९० लाख जमा; गतवर्षीपेक्षा दुप्पट जमा
सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने गुरुवारी एका दिवसात ९० लाखांची वसुली करीत रेकॉर्ड केले. गेल्या चार दिवसात तब्बल दोन कोटी रुपयांची वसुली झाल्याचे सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांनी सांगितले. दरम्यान, गतवर्षीपेक्षा सप्टेंबरअखेर घरपट्टी विभागाने दुप्पट वसुली केली असून आजअखेर १४ कोटीचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर कर वसुलीवर भर दिला आहे. विशेषत: गेल्या काही वर्षापासून थकबाकी असलेल्या कराच्या वसुलीबाबत आयुक्तांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. घरपट्टी विभागाचे प्रमुख रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील वसुली पथकाने कर वसुलीची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. घरपट्टी विभागाकडे ३७ कोटीची थकबाकी आहे. आजअखेर या थकबाकीपैकी १० ते साडेदहा कोटीची वसुली झाली आहे.
चालू घरपट्टीची बिलेही मालमत्ता धारकांना देण्यात आली आहेत. त्यातून चार कोटी वसूल झाले आहेत. आतापर्यंत १४ कोटीची वसुली झाली आहे. गतवर्षी सप्टेंबरचा वसुलीचा आकडा ६ कोटी ४१ लाख रुपये होता. यंदाची वसुली पाहता, गतवर्षीच्या तुलनेत ती दुप्पट आहे.
याबाबत रमेश वाघमारे म्हणाले की, यंदा घरपट्टी विभागाला चालू व थकीत कराचे ७० कोटीच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी ६० कोटीची वसुली आम्ही मार्चअखेरपर्यंत करू. थकबाकी वसुलीवर आमचा भर असून त्यादृष्टीने नियोजन केले आहे. गुरुवारी एका दिवसात ८७ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यापुढेही ही मोहीम गतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने सांगितली. (प्रतिनिधी)
आॅनलाईन कर भरणा सुविधा देणार
महापालिका क्षेत्रातील नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टीची बिले आॅनलाईन भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी संगणक विभागाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा शुक्रवारी उघडल्या जाणार आहेत. येत्या दोन महिन्यात ही सुविधा सुरू होईल. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल, असे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.