पूर नुकसानीची कर्नाटककडून वसुली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:46 AM2019-09-12T00:46:25+5:302019-09-12T00:46:29+5:30

सांगली : सांगली जिल्ह्यातील महापुराला कोयना धरणाच्या असमन्वयासह अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरही तितकेच कारणीभूत आहे. शहरातील नुकसानीच्या भरपाईसाठी महापालिकेने अलमट्टी ...

Recover the flood damage from Karnataka | पूर नुकसानीची कर्नाटककडून वसुली करा

पूर नुकसानीची कर्नाटककडून वसुली करा

Next

सांगली : सांगली जिल्ह्यातील महापुराला कोयना धरणाच्या असमन्वयासह अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरही तितकेच कारणीभूत आहे. शहरातील नुकसानीच्या भरपाईसाठी महापालिकेने अलमट्टी धरणाच्या प्रशासनाविरोधात याचिका दाखल करावी, अशी मागणी बुधवारी सर्वपक्षीय, संघटनांच्या बैठकीत करण्यात आली.
महापौर संगीता खोत यांच्या पुढाकाराने महापुराच्या उपाययोजना व पूरनियंत्रण समिती स्थापन करण्याबाबत महापालिकेत सर्वपक्षीय संघटनांची बैठक झाली. या बैठकीला उपायुक्त राजेंद्र तेली, स्थायी सभापती अजिंक्य पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, हारुण शिकलगार, नगरसेविका स्वाती शिंदे, योगेंद्र थोरात, जगन्नाथ ठोकळे, लक्ष्मण नवलाई, भारती दिगडे, अनारकली कुरणे, विजय घाडगे, अमर पडळकर आदी उपस्थित होते.
माजी अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात राजापूर धरण, तेरवाड धरण, म्हैसाळ योजनेचे बॅकवॉटर यामुळे सांगलीत महापूर येतो. त्यावर उपाययोजना कराव्या लागतील. धरणात पाणीसाठा किती असावा, याचाही निकष आहे. प्रत्येकवर्षी अलमट्टी असो वा कोयना धरण, पाटबंधारे विभागाच्या नियमावलीनुसार महापूर न येण्यासाठी एक आॅगस्टपर्यंत ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा असता कामा नये. एक सप्टेंबरपर्यंत ७० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा असू नये. त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.
सतीश साखळकर म्हणाले, पूरनियंत्रण व त्यावर उपाययोजना, मदतीसाठी कोल्हापूरच्या धर्तीवर सांगलीतही डिझास्टर असोसिएशन स्थापन करावी. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, अनुभवी अधिकारी, तज्ज्ञ आदींची समिती करावी. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात महिला, मुलींना प्रशिक्षणाची व्यवस्था करावी.
शिवाजीराव ओऊळकर यांनी, महापुरावर सरदार पाटील यांनी पीएच.डी. केली आहे, त्यांचे मार्गदर्शन घेण्याची सूचना केली. शिकलगार म्हणाले, महापुराचे किंवा पावसाचे पाणी शामरावनगरात शिरल्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी माजी आमदार संभाजी पवार यांच्या निधीतून अडीच कोटी रुपयांची गटार बांधण्यात आली. पण ती चुकीच्या पद्धतीने झाल्याने फटका बसत आहे.
शैलेश पवार म्हणाले, सांगली-कोल्हापूर रस्ता पाण्याखाली जातो. तो जाऊ नये यासाठी या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या गटारी करून सर्व पाणी अंकलीमार्गे नदीकडे सोडण्यासाठी बांधीव गटारींचा प्रस्ताव होता. तो अमलात आणावा. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले, कोयना धरणातून विसर्गामुळे महापूर येतो. त्याऐवजी थेट कोयना धरणातून विसर्ग होणारे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे दुष्काळी भागाला द्यावे. यावेळी जगन्नाथ ठोकळे, मयूर घोडके, अश्रफ वांकर, आसिफ बावा यांनीही सूचना मांडल्या.
अखेर संगीता खोत यांनी, महापूर नियंत्रणाबाबत उपाययोजना, अलमट्टी धरण, कोयना धरणाबाबत सविस्तर शासनाला अहवाल दिला जाईल. महापुरासंदर्भात सर्वपक्षीय समिती स्थापून यासाठी शासनावर दबाव निर्माण करू आणि शहर विकासाचा लढा उभारू, असे आवाहन केले.

Web Title: Recover the flood damage from Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.