Sangli: पाच लाखापोटी ४० लाख वसूल, कृषी सहायक महिलेसह पतीवर सावकारीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:40 AM2023-12-15T11:40:43+5:302023-12-15T11:42:01+5:30

कर्जदाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे कारवाई

Recovery of 40 lakhs for five lakhs, crime of moneylender against agricultural assistant woman and husband in sangli | Sangli: पाच लाखापोटी ४० लाख वसूल, कृषी सहायक महिलेसह पतीवर सावकारीचा गुन्हा

Sangli: पाच लाखापोटी ४० लाख वसूल, कृषी सहायक महिलेसह पतीवर सावकारीचा गुन्हा

तासगाव : पाच लाखाच्या मुद्दलाच्या बदल्यात चाळीस लाख रुपयाचा मोबदला घेऊन आणखी एक कोटी २० लाख रुपयांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे महात्माजी निवृत्ती निकम (वय ५५, रा. हातनोली) यांनी सहा डिसेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

आठ दिवसानंतर त्यांची तब्येत ठिक झाल्यावर त्यांनी खासगी सावकारकी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कृषी विभागात कृषी सहायक म्हणून कार्यरत असणारी श्रद्धा शिवाजी जाधव आणि तिचा पती शिवाजी नारायण जाधव ( रा. हातनोली) यांच्या विरोधात तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महात्माजी निवृत्ती निकम यांचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसाय निमित्त पाच लाख रुपयांची रोख रक्कम श्रद्धा जाधव आणि शिवाजी जाधव यांच्याकडून घेतली होती. या दोघांनी २० टक्के दरमहा सावकारी व चक्रवाढ व्याजाने आकारणी करून पाच लाखाच्या मोबदल्यात ४० लाख रुपये परत घेतले. त्यानंतर आणखी एक कोटी २० लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी सातत्याने तगादा लावला. पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. 

या गोष्टीला कंटाळून महात्माजी निकम यांनी सहा डिसेंबरला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर आठ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी याबाबत तासगाव पोलिसात खासगी सावकारकी आणि आत्महत्येस प्रवृत्त गेल्याप्रकरणी, श्रद्धा जाधव आणि शिवाजी जाधव या पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. श्रद्धा जाधव ही तासगाव कृषी विभागाकडे कवठे एकंद येथे कृषी सहायक म्हणून कार्यरत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव तारडे करत आहेत.

Web Title: Recovery of 40 lakhs for five lakhs, crime of moneylender against agricultural assistant woman and husband in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.