घरपट्टीची थकबाकी २७ कोटींवर वसुलीसाठी पथक
By admin | Published: May 24, 2014 12:35 AM2014-05-24T00:35:58+5:302014-05-24T00:42:01+5:30
करसंकलनाबाबत आयुक्तांकडून गंभीर दखल
सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाच्या थकबाकीचा डोंगर वर्षानुवर्षे वाढतच आहे. यंदा ही थकबाकी २७ कोटींवर गेली आहे. याची गंभीर दखल घेत आज आयुक्त अजिज कारचे यांनी १६ कर्मचार्यांचे विशेष पथक नियुक्त केले असून, कोणत्याही परिस्थितीत थकबाकीचा डोंगर कमी झालाच पाहिजे, अशी सूचना त्यांनी दिली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या पथकामध्ये ९ वरिष्ठ कर्मचारी असून, त्यांना वॉरंट आॅफिसरची जबाबदारी देण्यात आली आहे. ९ कनिष्ठ कर्मचारी लिपिक म्हणून कार्यरत राहणार असून, ३ शिपाईसुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत. घरपट्टीची थकबाकी व चालू वसुली याबाबत या पथकाला उद्दिष्ट देण्यात आले आहे. या पथकाच्या कामावर आयुक्तांचे नियंत्रण राहणार आहे. घरपट्टी थकबाकीचा चालू उद्दिष्टासह एकूण आकडा २७ कोटींवर गेला आहे. आर्थिक अडचणींमुळे हैराण असलेली महापालिका आता घरपट्टी थकबाकीमुळे हैराण झाली आहे. घरपट्टी थकबाकीचा डोंगर महापालिकेच्या स्थापनेपासून कायम आहे. जुनी थकबाकी आणि चालू उद्दिष्ट यांच्या वसुलीसाठी नेहमीच या विभागाला तारेवरची कसरत करावी लागली. अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरे साहित्य या गोष्टीही वसुलीवर परिणाम करणार्या होत्या. नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या संस्था, कार्यालयांचीही घरपट्टी थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. घरपट्टी वसुली करताना काही संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने अशा न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्येही महापालिकेला काही करता येत नाही. नागरिकांकडून घरपट्टीची वसुली करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. सर्वसामान्य मालमत्ताधारक प्रामाणिकपणे कर भरत असताना मोठमोठ्या संस्था व राजकीय लोकांच्या हितसंबंधात अडकलेल्या मालमत्तांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. राजकीय हस्तक्षेप थांबला तरच वसुलीचा डोंगर कमी होऊ शकतो. त्यासाठी आयुक्तांनी कडक भूमिका स्वीकारण्याची गरज आहे. जकात विभागातही असाच राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कित्येक वर्षे या विभागाला मोठी गळती होती. जकातीचा खासगी ठेका दिल्यानंतर जकातीच्या उत्पन्नाचे खरे आकडे स्पष्टपणे दिसले. त्यानंतर महापालिकेने ठेकेदारी बंद करून स्वबळावर वसुली सुरू केली. शंभर कोटींपर्यंतची मजल या विभागाने मारली. या गोष्टी साध्य करताना राजकीय हस्तक्षेप बंद केल्याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळेच घरपट्टीबाबतही अशीच भूमिका स्वीकारण्याची गरज आहे. आयुक्तांनी घरपट्टी वसुलीबाबत गांभीर्याने पावले उचलल्यामुळे या विभागालाही आता दिलासा मिळाला आहे. नव्या पथकामुळे वसुली वाढण्यास मदत होणार आहे. थकबाकीसह चालू उद्दिष्टावरही लक्ष केंद्रित केले आहे. (प्रतिनिधी)