वसुली बाज व माफिया सरकारच्या तावडीतून महाराष्ट्राला मुक्त करणार-किरीट सोमय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 05:27 PM2022-05-26T17:27:05+5:302022-05-26T18:03:35+5:30
महाराष्ट्र सरकारला पेट्रोल व डिझेलवरील टॅक्स हा कमी करावाच लागेल
आटपाडी : महाराष्ट्रातील ठाकरे व पवार यांचे सरकार हे वसुली बाज व माफिया सरकार आहे. महाराष्ट्रमध्ये रोज एक नवा घोटाळा बाहेर येत आहे. महागाई वाढवण्याचे पाप हे ठाकरे सरकारने केले आहे. महाराष्ट्र सरकारला पेट्रोल व डिझेलवरील टॅक्स हा कमी करावाच लागेल. वसुली बाज व माफिया सरकारच्या तावडीतून महाराष्ट्राला मुक्त करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
बनपुरी (ता. आटपाडी) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रवीण दरेकर म्हणाले की, ठाकरे सरकारने तिजोरीतील पैशांचा वापर आपल्या संस्था व साखर कारखाने काढण्यासाठी केला. मुख्यमंत्री हे पवार यांना खुश करण्यासाठी काम करत आहेत. मुख्यमंत्री पद शाबूत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसला खुश करत आहेत.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, राजेंद्र आण्णा देशमुख व गोपीचंद पडळकर एकत्रच आहोत. येणाऱ्या निवडणुका आम्ही मोठ्या ताकतीने लढून जिंकणार आहोत.
सदाभाऊ खोत म्हणाले की, या सरकारला शेतकऱ्याच्या समस्यांचे काही देणे घेणे नाही. हे लुटारू सरकार आहे. गोपीचंद पडळकर व माझ्यावर अनेक चुकीची संभाषणे व्हायरल केली जात आहेत. काही ही करा आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही.
राजेंद्र आण्णा देशमुख म्हणाले की, आटपाडी तालुक्यामध्ये टेंभुचे पाणी आले आहे. विधान परिषदमध्ये टेंभुच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याच्या नुसारच टेंभुचे पाणी मिळाले आहे. त्याचे श्रेय गोपीचंद पडळकर यांना जाते.
यावेळी मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, संगीता खोत, हर्षवर्धन देशमुख, जयवंत सरगर आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे
आमदार अनिल बाबर याचे नाव न घेता पडळकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले म्हणून आम्ही मत दिली. पण, हा गडी आमच्याच कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम करत आहे.