‘रोजगार हमी’तून प्राथमिक शाळेत शिपाई नेमा;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:55+5:302020-12-07T04:19:55+5:30
शेगाव : ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा भौतिक विकास रोजगार हमी योजनेतून साधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र शाळांची ...
शेगाव : ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा भौतिक विकास रोजगार हमी योजनेतून साधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र शाळांची मालमत्ता संरक्षण आणि स्वच्छता ठेवण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये शिपाई पद भरणे आवश्यक आहे. यामुळे राज्यातल्या शाळांमध्ये रोजगार हमी योजनेतून शिपायाची नेमणूक करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक नेते मच्छिंद्र ऐनापुरे यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेले आठ-नऊ महिने शाळा कोरोना संसर्गामुळे बंद आहेत. विद्यार्थी नसल्याने या शाळांमध्ये गवत, झाडेझुडपे उगवली आहेत. स्वच्छतागृहे आणि शौचालयांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सध्या या शाळांची अवस्था बकाल झाली आहे.
सुटयांमध्ये शिक्षक शाळांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. शिवाय शाळांमध्ये झाडलोट, पाणी भरणे, परिसराची स्वच्छता करणे या गोष्टीदेखील शिक्षक व विद्यार्थ्यांनाच कराव्या लागतात. शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व शाळेची मालमत्ता संरक्षित करण्यासाठी कायमस्वरूपी शिपायाची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. यामुळे शाळेचे भौतिक नुकसान टळेल आणि सरकारच्या पैशाचा अपव्ययही होणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून शाळेत रोजगार हमी योजनेतून शाळेच्या पटसंख्येनुसार रक्षक किंवा शिपायाची नेमणूक करावी, अशी मागणी ऐनापुरे यांनी केली आहे.