सांगली जिल्हा परिषदेच्या ६१६ पदांसाठी जानेवारीत भरती, प्रशासनाकडून नियोजन पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:31 PM2022-11-24T12:31:57+5:302022-11-24T12:32:18+5:30
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडे ७७० कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
सांगली : जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडे ७७० कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यापैकी ८० टक्के पदे भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्यानुसार ६१६ पदे भरण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. जानेवारी महिन्यात रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया चालू होणार असल्याचे राज्य शासनाच्या आदेशात म्हटले आहे.
जिल्हा परिषदेकडे बांधकाम, सामान्य प्रशासन, कृषी, आरोग्य, छोटे पाटबंधारे, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत, शिक्षण आदी विभागासाठी दोन हजार ६९ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यामध्ये शिक्षकांच्या पदांचा समावेश नाही. यापैकी सध्या एक हजार २९९ कार्यरत असून ७७० पदे रिक्त आहेत. राज्य शासनाने रिक्त पदांच्या ८० पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार ६१६ रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न चालू आहेत. या रिक्त पदाच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
भरण्यात येणाऱ्या पदामध्ये कनिष्ठ सहाय्यक ३०, लघुलेखक एक, ग्रामसेवक ५६, आरोग्य सेवक पुरुष १३४, आरोग्यसेविका २७८, औषध निर्माण अधिकारी १९ अशी ६१६ रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया दि. ३१ जानेवारी २०२३ पासून चालू होणार आहे. पात्र उमेदवारांची एप्रिल २०२३ मध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत.
अशी भरली जाणार पदे
विभाग - भरण्यात येणारी पदसंख्या
आरोग्य - ४५३
ग्रामपंचायत - ५९
सामान्य प्रशासन - ३१
बांधकाम - २३
पशुसंवर्धन - २२
छोटे पाटबंधारे - ०८
वित्त विभाग - ०६
महिला व बालकल्याण - ०७
कृषी - ०१
एकूण - ६१६