सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोकरभरती, गाळे बांधकामाची चौकशी सुरु
By संतोष भिसे | Published: November 29, 2022 06:59 PM2022-11-29T18:59:10+5:302022-11-29T18:59:40+5:30
चौकशी अहवाल ३० दिवसांत सादर करण्याचे आदेश
सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सोमवारी काढले. चौकशीसाठी विशेष लेखापरीक्षक संजय पाटील, सहायक निबंधक अनुष्का पाटील व विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांची नियुक्ती केली आहे. महिन्याभरात चौकशी पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश उपनिबंधकानी दिले आहेत.
यासंदर्भात स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी तक्रार केली होती. समितीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदोन्नती न नवी नोकरभरती यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी म्हंटले होते. कोल्हापूर रस्त्यावरील फळबाजार आवारातील जागा शीतगृहासाठी आरक्षित असताना तेथे व्यापारी गाळे बांधण्यात आल्याचीही तक्रार केली होती. उपनिबंधकांनी विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांच्यामार्फत ऑक्टोबर महिन्यात तक्रारींची चौकशी केली, त्यावेळी त्यात तथ्य आढळले. त्यानंतर गैरव्यवहारांच्या सखोल चौकशीचे आदेश काढले.
आदेशात म्हंटले आहे की, १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील समितीच्या कामकाजाचे लेखापरीक्षण पूर्ण होऊन १७ ऑक्टोबररोजी अहवाल सादर झाला आहे. त्यामध्ये काही गंभीर बाबी, गैरप्रकार, प्रशासकीय कामकाजात दोष, पोटनियमांचे उल्लंघन आदी बाबी आढळल्या आहेत. समितीत आर्थिक अनियमितता झाल्याचेही दिसून येते. त्याची सखोल चौकशी झाल्यानंतरच समितीची नेमकी आर्थिक स्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात येत आहेत. चौकशी अहवाल ३० दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गाळे बांधकामात गाळा?
फराटे यांच्यासह आणखी काही संघटनांनी समितीच्या कामकाजाविषयी तक्रारी केल्या होत्या. फळ बाजार आवारातील गाळ्यांचे बांधकाम गैरव्यवहाराच्या अनुषंगाने चर्चेत होते. मिरज दुय्यम आवारातील गाळे बांधकामाविषयीदेखील बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. उपनिबंधकांच्या चौकशीनंतर त्यातील गैरव्यवहार निश्चित होणार आहे