खूशखबर! सांगली महापालिकेत नव्या वर्षात नोकरभरती, उत्पन्नही वाढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 05:48 PM2022-12-31T17:48:34+5:302022-12-31T17:49:36+5:30
महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना सुरू
सांगली : अनेक वरिष्ठ अधिकारी निवृत्त झाल्यानंतर कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यावर महापालिकेचा गाडा सुरू आहे. जानेवारी महिन्यात महापालिकेच्या आकृतिबंधाला शासनाकडून मान्यता मिळणार आहे. त्यानंतर अत्यावश्यक पदाची भरती केली जाणार असल्याचे आयुक्त सुनील पवार यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयुक्तांनी नवनवे संकल्प सोडत महापालिकेला सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पवार म्हणाले की, महापालिकेच्या आस्थापनेवर २३७८ पदे मंजूर आहेत. शहराचा विस्तार पाहता ही पदे कमी आहेत. त्यात अनेक अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्याने कामकाजात अडचणी येत आहेत. प्रशासनाने नवीन आकृतीबंध शासनाला सादर केला आहे. त्यात नवीन २४६७ पदाची निर्मिती केली आहे. २० ते २५ जानेवारीपर्यंत आकृतीबंधाला मंजुरी मिळेल. त्यानंतर अत्यावश्यक व तांत्रिक पदाची भरती प्रक्रिया हाती घेतली जाईल.
नवीन वर्षात कुपवाड ड्रेनेज योजना हाती घेतली जाईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. मलशुद्धीकरण केंद्राच्या जागेबाबत सुनावणी पूर्ण झाली आहे. लवकरच जागा ताब्यात घेतली जाईल. माझी वसुंधरांतर्गत महापालिकेला सात कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. यातील पन्नास टक्के निधीतून शहरात हरित उद्याने उभारली जाणार आहे. महापालिकेच्या खुल्या भूखंडावर वृक्षारोपणाची मोहीम हाती घेऊ. महापालिकेची उपविधी व सभा नियमावलीही तयार केली जाणार आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी डाॅग स्काॅड उभारणार आहोत.
महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. २००४ साली घरपट्टीचे झोन तयार केले. तेव्हाचे दर आहेत. कोल्हापूर रोडवरील ४९० घरांचा सर्व्हे केला असता २६ लाखांचे उत्पन्न ५३ लाखापर्यंत वाढले. कोणतीही दरवाढ न करता घरपट्टीत वाढ होणार आहे.
ट्रक पार्किंगच्या जागेत एसटीपी
शेरीनाल्यावर ६७ कोटी रुपये खर्चाचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी खासगी जागा घेण्याबाबत विचार होता. पण महापालिकेच्या ट्रक पार्किंगच्या जागेपैकी १० एकर जागेबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. उर्वरित १७ एकर जागेपैकी दोन एकर जागेवर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे पवार म्हणाले.