भरतीप्रश्नी जिल्हा बॅँकेकडून कॅव्हेट दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 01:06 AM2019-11-25T01:06:55+5:302019-11-25T01:07:03+5:30
सांगली : चारशे पदांच्या नोकरभरतीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप जिल्हा सुधार समितीमार्फत झाल्यानंतर त्याबाबतची खबरदारी म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. अॅड. अमित शिंदे यांना त्याची नोटीस प्राप्त झाली आहे.
सांगली : चारशे पदांच्या नोकरभरतीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप जिल्हा सुधार समितीमार्फत झाल्यानंतर त्याबाबतची खबरदारी म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. अॅड. अमित शिंदे यांना त्याची नोटीस प्राप्त झाली आहे.
बँकेच्या चारशे जागांसाठी अमरावती येथील महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट आॅफ सॉफ्टवेअर-हार्डवेअर कंपनीमार्फत आॅनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ७ हजार १४९ उमेदवारांनी प्रत्येकी दोन हजार रुपये शुल्क भरून प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यातील १ हजार २४३ उमेदवार गैरहजर राहिल्याने उर्वरित ५ हजार ९०६ उमेदवारांची लेखी परीक्षा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आॅनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. आचारसंहिता संपल्यानंतर परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. एकास तीन याप्रमाणे १२६० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते. ३० आॅक्टोबरपासून ११ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती पार पडल्या. बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुलाखती घेतल्या होत्या. आॅनलाईन परीक्षा ९० गुणांची, तर मुलाखतीसाठी दहा गुण आहेत. त्यापैकी पाच गुण शैक्षणिक गुणवत्तेला आणि पाच गुण प्रश्नांसाठी होते. संबंधित कंपनीकडून आॅनलाईन परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण यांची बेरीज करुन अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. लिपिक पदाच्या चारशेजणांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच जिल्हा सुधार समितीमार्फत बँकेच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. याप्रश्नी न्यायालयात जाण्याचा इशाराही समितीने दिला होता. न्यायालयीन प्रकरण होऊन याप्रकरणी स्थगिती मिळू नये म्हणून जिल्हा बँकेने येथील कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. जिल्हा सुधार समितीसह बँक एम्प्लॉईज् युनियन यांच्याविरोधात हे कॅव्हेट आहे.