दिवाळी स्पेशल रेल्वेचा सांगलीला रेड सिग्नल; जोधपूर-बेंगलोर एक्सप्रेसचा थांबा केवळ मिरजेलाच
By अविनाश कोळी | Published: November 6, 2023 03:44 PM2023-11-06T15:44:03+5:302023-11-06T15:44:29+5:30
रेल रोको आंदोलनाचा इशारा
सांगली : दिवाळी विशेष जोधपूर-बेंगलोर एक्सप्रेसला संपूर्ण मार्गावर एकूण ३२ थांबे देताना पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगलीरेल्वे स्टेशनला डावलण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त होत आहे.
मुंबई, पुणे, बेंगलोर, सुरत, बडोदा, अहमदाबादला जाणाऱ्या सर्व नियमित रेल्वे गाड्या फुल्ल आहेत. त्यामुळे जोधपूर-अहमदाबाद-सुरत-मुंबई-हुबळी-बेंगलोर मार्गावर १४ विशेष गाड्या दिवाळीमध्ये सोडण्यात येत आहेत. पण त्या गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला नाही. या सर्व गाड्या सांगली रेल्वे स्टेशनवरून सुसाट निघून जातील. अन्य ठिकाणी जवळच्या दोन ते तीन स्थानकावर थांबे दिले असताना केवळ सांगली जिल्ह्यात एकमेव मिरजेलाच थांबा दिला आहे. सांगलीला नेहमीच नव्या रेल्वेंसाठी रेड सिग्नल दाखविला जातो. त्यामुळे प्रवाशी संघटनांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
रेल्वेनेच निकष बाजुला केला
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुण्यानंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे सांगली रेल्वे स्टेशन आहे. याठिकाणी एसी व स्लीपर क्लासची तिकिटे मोठ्या प्रमाणावर बुक होतात. सांगली स्टेशनवर थांबणाऱ्या जवळपास सर्व एक्सप्रेस गाड्यांचे प्रतिदिन प्रति फेरी उत्पन्न ४० हजार ते ६० हजार आहे. रेल्वे बोर्डाच्या निकषाप्रमाणे ज्या रेल्वे स्टेशनचे प्रति दिवस प्रति फेरी उत्पन्न १२ हजार पेक्षा जास्त असेल त्या रेल्वे स्टेशनवर प्रत्येक एक्सप्रेस गाडीला थांबा द्यावा लागतो. रेल्वे बोर्डाच्या निकषापेक्षा सांगली रेल्वे स्टेशनचे उत्पन्न पाचपट आहे. तरीही दिवाळी विशेष रेल्वे गाडी व संपर्क क्रांती यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा दिला नाही.
रेल रोको आंदोलनाचा इशारा
दिवाळी विशेष गाडी क्र. ०४८१३/०४८१४ जोधपूर(भगत की कोठी)-बेंगलोर दिवाळी विशेष गाडी, गाडी क्र. २२५८५/२२५८६ व १२६२९/१२६३० संपर्क क्रांतीला सांगली रेल्वे स्टेशनवर त्वरित थांबा द्यावा, अन्यथा ही गाडी सांगली रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात येईल, असा इशारा नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिला आहे.
प्रत्येकवेळी नवी गाडी सुरु करताना मिरजेसह सांगलीलाही थांबा द्यायला हवा. सांगली हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण तसेच महापालिका आहे. याशिवाय रेल्वेच्या निकषापेक्षा अधिक उत्पन्न सांगलीचे स्थानक देते. त्यामुळे थांबे मंजूर करायला हवेत. - उमेश शहा, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप