अम्युझमेंट पार्कच्या प्रस्तावाला रेड सिग्नल

By admin | Published: July 18, 2016 11:24 PM2016-07-18T23:24:32+5:302016-07-19T00:19:37+5:30

महापालिका : सत्ताधारी काँग्रेसच्या बैठकीत सदस्यांचा संताप, चुकीच्या प्रस्तावांमुळे बदनामी होत असल्याची खंत

Red Signal's proposal for Amusement Park | अम्युझमेंट पार्कच्या प्रस्तावाला रेड सिग्नल

अम्युझमेंट पार्कच्या प्रस्तावाला रेड सिग्नल

Next

सांगली : पूरपट्ट्यात अम्युझमेंट पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला सोमवारी सत्ताधारी काँग्रेसच्या बैठकीत तीव्र विरोध करण्यात आला. अशा प्रस्तावांमुळे सत्ताधारी गटाची व महापालिकेची बदनामी होत असल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केल्यानंतर, सर्वानुमते हा प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी, १९ जुलै रोजी सांगलीत होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रतोद किशोर जामदार यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी गटाची बैठक पार पडली. या बैठकीस सत्ताधारी गटाचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पूरपट्ट्यातील अम्युझमेंट पार्कचा विषय चर्चेला आला. पूरपट्ट्यातच आठ एकर जागेवर अम्युझमेंट पार्क (करमणूक उद्यान) विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिकेत दाखल झाला होता. महासभेत याविषयी धोरणात्मक निर्णय घेऊन प्रस्तावावर चर्चा केली जाणार होती. गेल्या काही वर्षांपासून पूरपट्ट्यातील अनेक बांधकामे वादग्रस्त बनली आहेत. या बांधकामांमुळे शहराच्या गावठाणातील पाणी निचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पूरपट्ट्यात महापालिकेचेच उद्यान विकसित करण्याचा घाट घातला होता. या प्रस्तावावर जोरदार टीका होऊ लागल्याने त्याचे पडसाद सत्ताधारी गटाच्या बैठकीत उमटले.
अशाप्रकारचे प्रस्ताव महापालिकेत कशासाठी आणले जातात?, असा सवाल करून, यामुळे महापालिकेची व पर्यायाने सत्ताधारी गटाची बदनामी होत आहे, असे मत बहुतांश सदस्यांनी मांडले. पूरपट्ट्यात कोणत्याही प्रकारची बांधकामे होऊ नयेत व तशापद्धतीचे प्रस्ताव सादर केले जाऊ नयेत, अशी मागणीही करण्यात आली. या प्रस्तावामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सत्ताधारी गटाला कोंडीत पकडले होते. त्यामुळेच सत्ताधारी गटाने अम्युझमेंट पार्कचा विषय आता बाजूला केला आहे. महापालिकेनेच अशापद्धतीने बेकायदेशीर बांधकाम केले, तर या परिसरात ज्यांचे प्लॉट आहेत, अशा लोकांना रितसर बांधकाम परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. उद्यान उभारण्यापेक्षा अशा लोकांची सोय करून देण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे पूरपट्ट्याशिवाय दुसऱ्या जागेचा प्रस्ताव का आला नाही?, असा सवाल राष्ट्रवादी नगरसेवकांनी उपस्थित केला होता. (प्रतिनिधी)


राष्ट्रवादीचा ऐनवेळच्या विषयांना विरोध
महासभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक सोमवारी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्यांनी आयत्यावेळी येणाऱ्या प्रस्तावांना, विषयांना विरोध करण्याची भूमिका मांडली. महासभेत अजूनही अशापद्धतीने ऐनवेळी विषय आणून त्यांचे ठराव केले जातात. या बेकायदेशीर गोष्टींना आक्रमकपणे तसेच कायदेशीररित्या विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. अम्युझमेंट पार्कचा प्रस्ताव सभेत आला तर तोही हाणून पाडण्याची भूमिका विरोधी सदस्यांनी स्पष्ट केली. सत्ताधारी गटाच्या चुकीच्या गोष्टींना विरोध करून, नागरी हिताच्या कामांसाठी आक्रमक व्हावे लागेल, असे मत राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ सदस्यांनी व्यक्त केले.


मदनभाऊ युवामंचचे निवेदन
याप्रश्नी मदनभाऊ युवामंचतर्फे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांना निवेदन देण्यात आले. नैसर्गिक नाले मोकळे करा, बायपास रोडवरील अम्युझमेंट पार्कचा प्रस्ताव रद्द करा, टोपू नकाशा उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत.


प्रस्तावामागे नेमके कोण?

Web Title: Red Signal's proposal for Amusement Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.