तासगाव तालुक्यास पुन्हा लालदिव्याची हुलकावणी?

By admin | Published: February 6, 2016 12:08 AM2016-02-06T00:08:23+5:302016-02-06T00:08:42+5:30

राष्ट्रवादी सदस्यांमध्ये दुफळी : जिल्हा परिषद सदस्यांचे एकमत होत नसल्याने नेत्यांची डोकेदुखी

Redemption of Tasgaon taluka again? | तासगाव तालुक्यास पुन्हा लालदिव्याची हुलकावणी?

तासगाव तालुक्यास पुन्हा लालदिव्याची हुलकावणी?

Next

सांगली : माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) हयात असतानाही तासगाव तालुक्याला सहज जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले असते. पण, इच्छुक महिलांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळेच सव्वा वर्षापूर्वी तासगाव तालुक्याची लाल दिव्याची गाडी मिळण्याची संधी हुकली होती. मात्र, आबांनी उर्वरित सव्वा वर्षासाठी माझ्या तालुक्यास संधी देण्याचा शब्द आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडून घेतला होता. दुर्दैवाने आबा आज हयात नसतानाही नेत्यांनी तासगावला अध्यक्षपदाची संधी दिली आहे. परंतु, यावेळीही इच्छुक सदस्यांनी पुन्हा टोकाची भूमिका घेतल्यामुळे तासगाव तालुक्यास लालदिव्याची हुलकावणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याच्या विकासाचा कणा आहे. म्हणून प्रत्येक नेता जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेवर वर्चस्व आहे. पहिली अडीच वर्षे सोडल्यास जिल्हा परिषदेच्या विकास कामाचा जनतेवर हवा तेवढा प्रभाव पडला नाही. बहुतांशी कालावधी पदाधिकारी बदल, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमधील संघर्षात गेला आहे. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापतींचा सव्वा वर्षाचा कालावधी संपला आहे. यातूनच अध्यक्षांना वगळून उर्वरित पाच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले होते. राजीनामे घेऊन दोन महिने झाले तरीही ते मंजूर झाले नाहीत. काही पदाधिकारी तर बदल होणार नसल्याचे ठामपणे सांगत आहेत. म्हणून काही नेत्यांशी चर्चा केली, तर अध्यक्षपद तासगाव तालुक्यास द्यायचे असून, तेथील एक नाव निश्चित होत नाही. आर. आर. पाटील (आबा) यांच्या कुटुंबियांनी मणेराजुरीच्या सदस्या योजनाताई शिंदे यांचे नाव निश्चित केले आहे. सावळज जि. प. गटातील सदस्या कल्पना सावंत आणि येळावी गटातील स्नेहल पाटील याही जि. प. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. कल्पना सावंत गटाने सावळज ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटाबरोबर आघाडी केली आहे. म्हणून आबा गटाचा सावंत यांच्या नावाला विरोध आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी शिंदे यांच्या नावाला विरोध करून सावंत यांचे नाव पुढे केले आहे. तासगाव तालुक्यामधील नेत्यांचे जि. प. अध्यक्षांच्या नावावर एकमत होत नाही. भाजपचा विरोध डावलून योजनाताई शिंदे यांना अध्यक्ष करायचे म्हटले, तर कल्पना सावंत वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. याचबरोबर पूर्वी राष्ट्रवादीत असणारे खा. संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे सध्या भाजपमध्ये, तर आमदार अनिल बाबर शिवसेनेत आहेत. या नेत्यांचे आठ ते दहा सदस्य आहेत. भाजपच्या नेत्यांची मने दुखावली, तर दहा सदस्य पदाधिकारी निवडीवेळी गैरहजर राहिल्यास वेगळ्या घडामोडी होऊ शकतात. म्हणूनच पदाधिकारी बदल लांबल्याची चर्चा आहे. नेत्यांकडूनही इच्छुकांना अशीच उत्तरे मिळत असल्यामुळे त्यांचीही चांगलीच पंचाईत झाली आहे. अध्यक्षपदाबाबत तासगाव तालुक्यात एकमत झाले नाही, तर पुन्हा एकदा तालुक्यास अध्यक्षपदाची हुलकावणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी) माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांची पुण्यतिथी दि. १६ फेब्रुवारी रोजी आहे. राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे राज्यभरातील प्रमुख नेते या कार्यक्रमास येणार आहेत. या पुण्यतिथी कार्यक्रमानंतर जि. प. पदाधिकारी बदलाबाबत राष्ट्रवादीचे नेते ठोस निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे जिल्हा परिषदेत बोलले जात आहे.

Web Title: Redemption of Tasgaon taluka again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.